भाईंदर येथील कांदळवनाजवळ दिसला सुवर्णकोल्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 02:06 AM2019-02-10T02:06:09+5:302019-02-10T02:06:27+5:30

भाईंदर पोलीस ठाण्यामागे कांदळवनाजवळ असलेल्या नेहरूनगर झोपडपट्टीत शनिवारी ‘गोल्डन फॉक्स’ अर्थात ‘सुवर्ण कोल्हा’ आढळला. त्याच्या पायाला जखम झालेली होती.

Golden collage seen near Kandlavan in Bhayander | भाईंदर येथील कांदळवनाजवळ दिसला सुवर्णकोल्हा

भाईंदर येथील कांदळवनाजवळ दिसला सुवर्णकोल्हा

Next

मीरा रोड : भाईंदर पोलीस ठाण्यामागे कांदळवनाजवळ असलेल्या नेहरूनगर झोपडपट्टीत शनिवारी ‘गोल्डन फॉक्स’ अर्थात ‘सुवर्ण कोल्हा’ आढळला. त्याच्या पायाला जखम झालेली होती. अग्निशमन दलाने प्राणिमित्रांच्या मदतीने त्याला पकडून ठाणे वनविभागाकडे सुपुर्द केले. ३० वर्षांनंतर या भागात कोल्हा दिसला, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. आधीच या भागात फ्लेमिंगो, सीगल व अन्य वन्य पक्षी येत असताना आता कोल्ह्याचे दर्शन घडले.
नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या कमळीबाई माछी यांच्या घराच्या व्हरांड्यात अडगळीत शनिवारी सकाळी हा कोल्हा दिसला. त्याला हटकले असता सुरुवातीला कुत्रा असल्याचे वाटले. पण, शेजारी राहणारे प्रभाकर मांगेला जेव्हा पाहायला आले, तेव्हा त्यांना हा कुत्रा नसून कोल्हा असल्याचे लक्षात आले.
प्रभाकर यांनी याबद्दल अग्निशमन दलास कळवले. या दलातून त्यांना वनविभागाचा क्रमांक देण्यात आला. तसेच दिलीप रणावरेंसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी गेले. अक्षय पाटील व अ‍ॅलॅक्स डिसोझा हे प्राणिमित्र तरुणही घटनास्थळी आले.
कोल्ह्याच्या गळ्यात फास टाकला असता त्याने झटक्यात दोरी चावून तोडून टाकली. तो चावण्यास धावून येत असल्याने काहीसे भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले. त्याच्या पायाला जखम झाली होती.
परंतु, अग्निशमन दलाचे जवान व प्राणिमित्रांनी कुशलतेने कोल्ह्याला पकडून अग्निशमन केंद्रात आणले. तेथून त्याला ठाण्याच्या तीनहातनाका येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले.
कोल्ह्याची वैद्यकीय तपासणी व जखमेवर उपचार करू. वनविभागाचे अधिकारीही तेथे जाऊन पाहणी करतील व आपला अहवाल देतील, असे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.
वाढत्या शहरीकरणाचा परिणाम
वाढत्या शहरीकरणात येथील कांदळवनाची तोड, भराव, बेकायदा झोपड्या व बांधकामे, कचरा-सांडपाण्यामुळे खाड्यांचे प्रदूषण आदींमुळे जंगलात आहार कमी झाल्याने हा कोल्हा भक्ष्याच्या शोधार्थ आला असावा, अशी शक्यता वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी वर्तवली आहे.

 

Web Title: Golden collage seen near Kandlavan in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे