ठाण्यात रंगला ‘ग्राउंड रोलर’चा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:19+5:302021-02-23T05:00:19+5:30
ठाणे : फुलांची सजावट आणि कस्टमाइज केक ही सर्व तयारी कोणाच्या वाढदिवसाची नव्हती, तर वर्तकनगर येथील ठाणे महापालिका शाळेच्या ...
ठाणे : फुलांची सजावट आणि कस्टमाइज केक ही सर्व तयारी कोणाच्या वाढदिवसाची नव्हती, तर वर्तकनगर येथील ठाणे महापालिका शाळेच्या मैदानाची गेल्या ५० वर्षांपासून निगा राखणाऱ्या ‘ग्राउंड रोलर’च्या सन्मान सोहळ्याची होती. या लाडक्या क्रिकेट रत्नाला अनोखी मानवंदना देण्यासाठी वर्तकनगर येथे रविवारी आजी-माजी खेळाडूंच्या आठवणींचा डाव रंगला.
ग्राउंड रोलरचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस जल्लोषात साजरा करताना आयुष्यातील अनेक भागीदारीचा किस्सा येथील खेळाडूंनी मांडला.
वर्तकनगर येथील ज्येष्ठ खेळाडूंच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ खेळाडूंची बॅटिंग या मैदानातून अनेक खेळाडू, डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, राजकारणी खेळून तयार झालेत. क्रिकेटमध्ये खेळाडूचा, प्रशिक्षकाचा, पंचाचा, ग्राउंडमनचा नेहमीच सन्मान केला जातो. मात्र, वर्तकनगर येथील या मैदानात प्रथमच ग्राउंड रोलरचा अनोखा सन्मान त्याच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ खेळाडू दाजी भगत, श्रीकांत म्हात्रे, मनोहर मोरजकर, बबन राणे, भाई सावंत आणि नितीन सिंघेवर आदी उपस्थित होते, तर अजित इलेव्हन संघाचे संस्थापक अजित म्हात्रे यांनी केक कापून या सोहळ्याची सांगता केली. स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत सातपुते हेही यावेळी उपस्थित होते.
५० वर्षांतील ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार
२१ फेब्रुवारी १९७१ रोजी हा ग्राउंड रोलर मैदानात आणण्यात आला. त्याला ५० वर्षे पूर्ण झाली. हा रोलर जागचा हलवण्यासाठी सात-आठ जणांची टीम लागते. गोलाकार लोखंडी आणि आत सिमेंट काँक्रिट ठासून भरलेल्या या ग्राउंड रोलरने टेनिस क्रिकेटची पंढरी असलेल्या वर्तकनगरच्या मैदानाची नेहमीच निगा राखली. याच मैदानात सुनील गावस्कर, कर्सन घावरी, सलीम दुराणी, सचिन तेंडुलकर, इक्बाल खान आणि रशीद पटेल या खेळाडूंचा खेळ ग्राउंड रोलरने पाहिला. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या सभाही याच मैदानावर गाजल्या आहेत. जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याचाही हा रोलर साक्षीदार आहे.
फोटो : २१ ठाणे रोलर वाढदिवस