टीडीआर प्रकरणी सोनवणेंची चौकशी
By admin | Published: November 25, 2015 01:44 AM2015-11-25T01:44:46+5:302015-11-25T01:44:46+5:30
कल्याणमधील मौजे चिकणघर येथील ७३ हजार चौरस मीटरच्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे
डोंबिवली : कल्याणमधील मौजे चिकणघर येथील ७३ हजार चौरस मीटरच्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहेत.
नगरविकास विभागाने शुक्रवारी पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठविलेल्या पत्रात रामनाथ सोनवणे हे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आस्थापनेवरील स्थानापन्न उपायुक्त संवगार्तील अधिकारी आहेत. त्यामुळे चिकणघर येथील टीडीआर घोटाळ्याची चौकशी आयुक्तांनी करावी, असे स्पष्ट केले आहे. सोनवणे यांनी अनेक वर्ष उल्हासनगर, जळगाव, कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त म्हणून काम केले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेतून उचलबांगडी झाल्यापासून शासनाने त्यांना अद्याप कोठेही नियुक्ती दिलेली नाही.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कल्याणमधील टीडीआर घोटाळाप्रकरणी सोनवणे यांची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले होते. महिना उलटला तरी नगरविकास विभागाकडून सोनवणे यांची चौकशी होत नसल्याने टीडीआर घोटाळा प्रकरणातील तक्रारदारांनी शासन सोनवणे यांना अभय देण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार विधान परिषदेच्या सभापतींकडे केली होती. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने नगरविकास विभागाने उपायुक्त सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे व त्यांची विभागीय चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी, असे आदेश दिले आहेत. सोनवणे यांची चौकशी केल्यानंतर अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्यात महापालिकेच्या नगररचना विभागातील तत्कालीन आयुक्तांचा सहभाग असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे व त्यांची चौकशी करण्याचे आदेश शासनाने प्रशासनाला यापूर्वीच दिले होते.