सोने पळवणारा मेकअपमन गजाआड!, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:06 AM2017-11-06T06:06:52+5:302017-11-06T06:07:28+5:30
राकेश पालांडे हा अभिनेत्री पूनम ढिल्लो हिचा एकेकाळचा मेकअपमन असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. विश्वास संपादन करून त्याने पूनमकडे जवळपास २० लाखांच्या दागिन्यांची चोरी केली होती. मात्र,
राजू ओढे
ठाणे : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याजवळचे जवळपास ७० तोळे सोने घेऊन फरार झालेल्या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये एका तरुणीसह अभिनेत्री पूनम ढिल्लोच्या मेकअपमनचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुलुंड येथील साईधाम रोडवरील भगरीमाता सोसायटीचा रहिवासी राकेश ऊर्फ रॉकी संभाजी पालांडे (२६) याचा नवरात्रौत्सवामध्ये श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीशी परिचय झाला. वागळे इस्टेटमधील लीला अपार्टमेंटची रहिवासी भावना नरेंद्र चुडासमा (२१) ही राकेशचा सख्खा भाऊ आकाश पालांडे याची मैत्रीण आहे. पीडित तरुणीला जाळ्यात ओढण्यासाठी राकेशने भावनाची मदत घेतली. पीडित मुलगी राकेशकडे आकर्षित होईल, यासाठी भावनाने पुरेपूर प्रयत्न केले. यातून त्या मुलीची राकेशशी जवळीक निर्माण झाली.
राकेश, आकाश, भावना आणि पीडित मुलगी यांची दोघांच्या भावी आयुष्याविषयी अनेकदा चर्चा झाली. या संबंधांबाबत आपण अतिशय गंभीर असून लग्नासाठीही तयार आहोत. मात्र, आपले कुटुंब यासाठी तयार होणार नाही. त्यामुळे पळून जाऊन लग्न करण्याचा प्रस्ताव राकेशने मुलीसमोर मांडला. घर सोडल्यानंतर आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी पैशांची गरज भासणार आहे. त्यामुळे घरून दागिने आणण्यास आरोपींनी सांगितले. २५ आॅक्टोबर रोजी पळून जाण्याचा बेत त्यांचा ठरला होता. याच महिन्यात दिवाळी होती. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी घरातील सर्व दागिने पूजेसाठी काढून ठेवले होते. आरोपींच्या भूलथापांना पूर्णत: बळी पडलेल्या पीडित मुलीने एका बॅगेमध्ये तब्बल २३ लाख रुपयांचे ७० तोळे दागिने घेऊन घर सोडले. या प्रकारामुळे हादरलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी श्रीनगर पोलिसांकडे बेपत्ताची तक्रार दाखल केली. तिकडे दागिन्यांची बॅग घेऊन आलेल्या मुलीला आरोपींनी पुन्हा भूलथापा दिल्या. लग्नामध्ये आकर्षक फोटो काढण्यासाठी महागडा मेकअप करण्याचा सल्ला त्यांनी मुलीला दिला. त्यानुसार, आरोपींनी मुलीला जवळच्याच एका ब्युटीपार्लरमध्ये नेऊन तिला हेअरकट आणि मेकअपसाठी बसवले. मुलीचा मेकअप सुरू असतानाच आरोपी दागिन्यांची बॅग घेऊन फरार झाले. पार्लरचा खर्च १० हजार ५०० रुपये झाला होता. आरोपी पसार झाल्यानंतर पार्लरचे बिल चुकते करण्यासाठीही मुलीकडे पैसे नव्हते. त्यामुळे संतापलेल्या मुलीने आरोपींना धडा शिकवण्याचा निश्चय केला.
दरम्यान, पीडित मुलीच्या मागावर असलेल्या पोलिसांनी तिला शोधून काढले. तिने झालेली गाथा पोलिसांसमोर कथन केली. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना हुडकून काढले. तिन्ही आरोपींना अटक
करून त्यांच्याजवळून ५८ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. उर्वरित सोने विकून आलेला पैसा आरोपींनी दारू आणि क्लबमध्ये उडवल्याची माहिती सुलभा पाटील यांनी दिली. राकेश आणि आकाश हे दोन्ही भाऊ सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे आणखी काही गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. २८ आॅक्टोबर रोजी आरोपींना अटक केल्यानंतर ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवारी न्यायालयाने या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
राकेश पालांडे हा अभिनेत्री पूनम ढिल्लो हिचा एकेकाळचा मेकअपमन असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. विश्वास संपादन करून त्याने पूनमकडे जवळपास २० लाखांच्या दागिन्यांची चोरी केली होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती सध्यातरी समोर आली नसल्याचे पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.
आकाशवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा
आकाश पालांडे याच्याविरुद्ध मुलीची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून आकाशने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणी मुलुंड येथील रहिवासी असल्याने श्रीनगर पोलिसांनी हा गुन्हा मुलुंड पोलिसांकडे वर्ग केला.