घोलवडला सुरू झाली मिडी
By admin | Published: December 9, 2015 12:35 AM2015-12-09T00:35:07+5:302015-12-09T00:35:07+5:30
घोलवड गावात रस्त्याला भगदाड पडल्यामुळे पंधरा दिवस एस.टी सेवा बंद होती. तथापी डहाणूहून चिखलेमार्गे बोर्डी येथील शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते.
बोर्डी : घोलवड गावात रस्त्याला भगदाड पडल्यामुळे पंधरा दिवस एस.टी सेवा बंद होती. तथापी डहाणूहून चिखलेमार्गे बोर्डी येथील शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. ते दूर करण्याची मागणी लोकमतच्या माध्यमातून नागरीकांनी केली होती. त्यानुसार मंगळवार दि. ८ डिसेंबर पासून मिडी बस सेवेला प्रारंभ झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांनी आनंद व्यक्त करून लोकमतचे आभार मानले आहेत.
घोलवड गावातील रस्त्याला भगदाड पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साधी बस प्रवासी वाहतुक डहाण्ूा बस आगाराने पंधरा दिवसापासून बंद केली. त्यामुळे या बसेस आगर, कॉरेज हॉस्पिटल, नरपड, साईबाबा, खाडीपाडा, चिखले, वडकतीपाडा, टोकेपाडा इ. बस थांब्यावरील प्रवाशांना घेउन घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जात होत्या. तथापी बोर्डीतील शाळा-महाविद्यालयापर्यंत पोहचण्याकरीता शेकडो विद्यार्थ्यांना चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. थकल्यामुळे अभ्यासाप्रमाणेच आरोग्यावर परिणाम जाणवत होता. तर काही विद्यार्थी शाळा बुडवत असल्याचे पालकांचे म्हणणे होते. बोर्डीत विद्यार्थ्यांची पायपीट या वृत्ताद्वारे घोलवड प्राथमिक केंद्र शाळेसमोरील पर्यायी मार्गावर मिडी बस सेवा सुरू करण्याची सूचना लोकमतच्या वृत्तामधून करण्यात आली होती.
डहाणू प्रांत अधिकारी अंजली भोसले यांनी बातमीची दखल घेत डहाणू बस आगार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना केली होती. चिखले व घोलवड महात्मा गांधी तंटामुक्त समितीने बातमीचा दाखला देवून संबंधीत विभागाशी संपर्क साधला होता.
दरम्यान डहाणू बस आगाराने तत्काळ पाहणी करून मिडी बसेस सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवला असून प्रतिदिन दहा फेऱ्या मंगळवार दि. ८ डिसेंबर पासून सुरू केल्या आहेत. लोकमतच्या वृत्ताने मिडी बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक व प्रवाशांनी आनंद व्यक्त करून आभार मानले आहेत.