‘गोंगाटा’मुळे वाचला बिबट्याचा जीव; अन्नपाण्याविना झाडाझुडपात होता पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:21 AM2022-02-16T06:21:40+5:302022-02-16T06:22:01+5:30
बदलापूरजवळील घटना: रविवारी रात्री गोरेगावच्या एका फार्म हाऊसवर जाणाऱ्या कुटुंबाने प्लास्टिकच्या भांड्यात तोंड अडकल्याने संकटात सापडून सैरभैर झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पाहिले होते.
पंकज पाटील
बदलापूर : बदलापूरच्या गोरेगावच्या जंगलात कालपासून शंभरेक लोक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह थाळ्या वाजवत, आरडाओरडा करीत फिरत होते. गेल्या चार दिवसांपासून पाण्याच्या प्लास्टिकच्या भांड्यात तोंड अडकल्यामुळे अन्नपाण्यावाचून झाडा-झुडपात निपचीत पडलेल्या बिबट्याचा जीव वाचवण्याकरिता ही मोहीम सुरू होती. आवाजामुळे बिबट्या झुडपातून बाहेर आला तरच त्याला वाचवणे शक्य होते. अखेर मंगळवारी सायंकाळी ही मोहीम यशस्वी झाली आणि बिबट्याच्या गळ्यात अडलेला प्लास्टिक जार काढून त्याला वाचवण्यात आले.
रविवारी रात्री गोरेगावच्या एका फार्म हाऊसवर जाणाऱ्या कुटुंबाने प्लास्टिकच्या भांड्यात तोंड अडकल्याने संकटात सापडून सैरभैर झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पाहिले होते. या घटनेची माहिती वन विभागाला दिली. सोमवारी सायंकाळपर्यंत वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र प्रयत्न करीत होते. सोमवारी रात्री ही शोधमोहीम सुरू होती; मात्र बिबट्या कुठेच न आढळल्याने तो कुठल्यातरी झुडपात असेल, अशी शक्यता होती. मंगळवारी सकाळपासून पथकाने बिबट्याचा शोध सुरू केला. त्याला झुडपातून बाहेर काढण्यासाठी आरडाओरडा करून आणि गोंगाट भरला जात होता. त्याला अखेर यश आले. लागलीच त्याच्या गळ्यातून प्लास्टिकचा जार काढला.