केडीएमटीच्या कंत्राटी चालक, वाहकांना येणार अच्छे दिन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:54 PM2020-02-26T23:54:35+5:302020-02-26T23:54:44+5:30
वेतन, महागाईभत्त्यात वाढ; उद्या होणार शिक्कामोर्तब
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील आस्थापनेवर कंत्राटी पद्धतीने घेतलेले चालक आणि वाहक यांच्या वेतनात वाढ होणार आहे. ही वाढ मूळ वेतन आणि महागाईभत्त्यात होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव व्यवस्थापनाने शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यतेसाठी पटलावर ठेवला आहे. प्रस्ताव मान्यतेनंतर चालकांना १७ हजार ५८९ तर, वाहकांना १६ हजार ७७४ रुपये वेतन मिळणार आहे.
केडीएमटी उपक्रमाच्या आस्थापनेवर मार्च २०१३ पासून हे कंत्राटी चालक आणि वाहक कार्यरत आहेत. सध्या ११ चालक तर ४८ वाहक सेवेत असून, किमान वेतन कायद्यानुसार त्यांना अनुक्रमे १२ हजार ९१६ आणि १२ हजार ४९६ रुपये वेतन मिळत आहे. परंतु, महागाईभत्त्यात झालेली वाढ पाहता चालक आणि वाहकांच्या मूळ वेतनासह महागाईभत्त्यात वाढ होणार आहे. सध्या मिळणाऱ्या चालकांच्या वेतनात चार हजार ६७३ रुपयांची वाढ सुचविली गेल्याने प्रस्ताव मंजुरीअंती त्यांना १७ हजार ५८९ रुपये वेतन मिळणार आहे. तर, वाहकांना मिळणाºया वेतनात चार हजार २७८ रुपयांची वाढ सुचविली गेल्याने त्यांना १६ हजार ७७४ रुपये वेतन उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, एकीकडे उपक्रमातील चालक आणि वाहकांचा पगार वेळेवर होत नाही. त्याला लागणारा विलंब तसेच नव्या वेतनवाढीच्या प्रस्तावामुळे तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा या पार्श्वभूमीवर परिवहन समितीमधील सर्वपक्षीय सदस्य संबंधित प्रस्तावाबाबत कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अडीच लाखांचा बोजा
कायद्यानुसार संबंधित कंत्राटी चालक आणि वाहकांना वेतनवाढ मिळणार असली तरी त्यामुळे उपक्रमावर महिन्याला दोन लाख ५६ हजार ७४७ रुपये तर, वर्षाला ३० लाख ८० हजार ९६४ रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.
सदस्य सकारात्मक
चालक आणि वाहकांना कायद्यानुसार वेतन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव वेतनाच्या प्रस्तावासंदर्भात माझ्यासह समितीचे सर्व सदस्य सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया सभापती मनोज चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.