केडीएमसीतील बालवाडी शिक्षिकांना अच्छे दिन?; किमान वेतनाचा प्रस्ताव महासभेपुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 01:04 AM2020-01-14T01:04:42+5:302020-01-14T01:04:52+5:30
कामाचे दोन तास वाढणार; मंजुरीकडे लागले लक्ष
कल्याण : केडीएमसीत कार्यरत असलेल्या बालवाडी शिक्षिकांना किमान वेतन लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव २० जानेवारीला होणाऱ्या महासभेत अंतिम मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, त्यांना विशेष भत्त्यासह १७ हजार ४४५ रुपये वेतन मिळणार आहे. याआधी त्यांना आठ हजार रुपये मानधन मिळत होते. किमान वेतन लागू होणार असल्यामुळे शिक्षिकांना दिलासा मिळणार असला, तरी त्यांच्या कामाचे दोन तास वाढणार आहेत.
केडीएमसी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा महापालिकेकडे १ नोव्हेंबर १९९४ पासून हस्तांतरित झाल्या. या प्राथमिक शाळांना जोडून सुरू असलेल्या बालवाड्या चालविण्यासाठी लागणारे अनुदान राज्य सरकारने दिल्यास त्या चालविण्याची तयारी महापालिकेने दर्शविली होती. त्यानुसार, आठव्या पंचवार्षिक योजनेच्या उर्वरित कालावधीत या बालवाड्या चालविण्यासाठी १ नोव्हेंबर १९९४ पासून केडीएमसीला १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना जोडून सुरू असलेल्या बालवाड्या व त्यातील कार्यरत असलेल्या साधारण २१५ बालवाडी शिक्षिका केडीएमसीकडे वर्ग करण्यात आल्या. सध्या महापालिकेत ६७ बालवाडी शिक्षिका आणि दोन दायी आहेत. या बालवाडी शिक्षिकांना दरवर्षी एप्रिल ते मार्च या शैक्षणिक वर्षासाठी दोन दिवसांचा खंड देऊन त्यांची पुनर्नियुक्ती केली जाते. मात्र, या शिक्षिकांना १ जून २०१५ पासून आठ हजार रुपये मानधन मिळत आहे. सध्या बालवाडीसाठी तीन तास आणि नेमून दिलेल्या प्रभाग आणि आरोग्य केंद्रात तीन तास असे सहा तास त्या काम करीत आहेत. सहा तास काम करीत असल्याने त्या किमान वेतनासाठी पात्र ठरल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने महासभेकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला शिक्षण समितीची आॅगस्ट २०१९ ला मान्यता मिळाली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव २० जानेवारीच्या महासभेत ठेवला आहे. किमान वेतन लागू झाल्यास शिक्षिकांच्या कामाचे दोन तास वाढणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचे तास सहावरून आठ तास होणार आहेत. सर्वपक्षीय नगरसेवक या प्रस्तावाबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद ?
बालवाडी शिक्षिकांना सध्या आठ हजार रुपये, तर दायींना दोन हजार रुपये मानधन मिळते. आता किमान वेतन लागू झाल्यास विशेष भत्त्यासह ६७ बालवाडी शिक्षिकांना प्रत्येकी १७ हजार ४४५, तर दोघा दायींना प्रत्येकी १४ हजार ९४५ रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
महापालिकेचा किमान मासिक वेतनावर ७९ लाख चार हजार ४६० रुपये वाढीव खर्च होणार आहे. तर, वार्षिक खर्च एक कोटी ४३ लाख ८४ हजार ४६० इतका होणार आहे.