ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:12 AM2020-01-02T00:12:23+5:302020-01-02T00:12:30+5:30

सिटी स्कॅन आणि डिजिटल एक्सरेची सुविधा; चार महिन्यांत ५६२ रुग्णांचे सिटी स्कॅन

'Good day' to poor people in Thane District General Hospital | ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना ‘अच्छे दिन’

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना ‘अच्छे दिन’

Next

- पंकज रोडेकर

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या सिटी स्कॅन आणि डिजिटल एक्सरे यासारख्या सुविधांमुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना आता कुठे अच्छे दिन आले आहेत. या सुविधा सुरू झाल्यापासून, म्हणजे चार महिन्यांत ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ५६२ रुग्णांचे सिटी स्कॅन केले असून १०० रुग्णांचे डिजिटल एक्सरे काढले आहेत. अपघाताच्या घटनांमधील रुग्णांना या सुविधांचा सर्वाधिक लाभ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

शहरी भागासह ग्रामीण भागातील गोरगरिबांचे रु ग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रु ग्णालय ओळखले जाते. पण, मागील काही वर्षांपूर्वी येथील सिटी स्कॅ न मशीन बंद पडल्याने गोरगरिब रुग्णांना वारंवार खाजगी रुग्णालयांत सिटी स्कॅन करण्यासाठी जावे लागत होते. अन्य विविध कारणांमुळेही हा विभाग रुग्णालयात पुन्हा सुरू होऊ शकला नाही. हा विभाग सुरू करण्यासाठी तत्कालीन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातच, ठाणे नियोजन समितीच्या बैठकीतही सिटी स्कॅन मशीनसाठी काही निधी उपलब्ध झाला होता. मात्र,जागेअभावी हा विभाग सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर, जिल्हा शल्यचिकित्सकपदाची धुरा डॉ. कैलास पवार यांनी स्वीकारल्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या मुद्यांपासून बरेच मुद्दे मार्गी लागले. या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची सिटी स्कॅन करण्यासाठी होणारी धावपळ आणि खाजगी ठिकाणी होणारी लूट लक्षात घेता, त्यांनी सिटी स्कॅन मशीनपासून डिजिटल एक्सरेसारखे विभाग तातडीने सुरू करण्यासाठी अपघात विभाग इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देत, तेथे तातडीने हे विभाग सुरू करण्यासाठी पावले उचलली. या विभागांचा सप्टेंबर २०१९ मध्ये शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

या विभागात ५६२ रुग्णांचे माफक दरात सिटी स्कॅन करण्यात आले. तसेच १०० रुग्णांचे डिजिटल एक्सरे काढल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

हा विभाग सुरू झाल्यानंतर गरजू रुग्णांना फायदा होत आहे. या विभागात गोरगरीब रुग्णांचे माफत दरात सिटी स्कॅन व डिजिटल एक्सरे काढण्यात येत आहेत. हे विभाग झाल्यापासून आतापर्यंत ५६२ रुग्णांचे सिटी स्कॅन, १०० रुग्णांचे डिजिटल एक्सरे काढले आहेत.
- डॉ. कैलास पवार, शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय

Web Title: 'Good day' to poor people in Thane District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.