शिक्षकांनाही येतील अच्छे दिन
By Admin | Published: April 26, 2017 11:50 PM2017-04-26T23:50:00+5:302017-04-26T23:50:00+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे शिक्षकांनाही अच्छे दिन येतील. त्यामुळे शिक्षकांना पोर्टेबल कार्यालयाची गरजही भासणार नाही, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
टिटवाळा : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे शिक्षकांनाही अच्छे दिन येतील. त्यामुळे शिक्षकांना पोर्टेबल कार्यालयाची गरजही भासणार नाही, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय पोर्टेबल कार्यालयाचे उद्घाटन रविवारी येथे पवार आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामपाल सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बस्वदे, संघाच्या कार्याध्यक्षा सुलभा दोंदे व नगरसेवक संतोष तरे, नीलेश शेलार, संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव, देशमुख सर आदी उपस्थित होते. त्यावेळी पवार बोलत होते.
टिटवाळा लगतच म्हस्कळ रोडला गणेश विद्यालयाच्या मागे संघाने भव्य शिक्षक भवन उभारण्यासाठी चार एकत्र जागा शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून घेतली आहे. तेथेच सध्या पोर्टेबल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी ते म्हणाले की, ‘केंद्रातील सरकारने फक्त शिक्षकांवर नाही, तर सर्व कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय केला आहे.
शिक्षकांना जुनी पेशन पद्धती लागू करावी, शिक्षक आयोगाचे एकत्रीकरण करा, देशभरातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्यांसंदर्भात वारंवार सरकार दरबारी तसेच पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या भेटी घेतल्या, परंतू काही उपयोग झाला नाही. त्यामुळे धरणे आंदोलन छेडण्यात येईल.
सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास ५ आॅगस्टला देशातील संपूर्ण शासकीय तालुका व जिल्हास्तरीय मुख्य कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने शिक्षक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक सहभागी होतील. त्यानंतर ५ सप्टेंबरला राज्यापालांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतरही सरकार न सुधारल्यास ५ आॅक्टोबरला नवी दिल्लीतील जंतर-मंतर
येथे धरणे आंदोलन छेडले जाईल. तेथेही न्याय न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू.’ (वार्ताहर)