गुडन्यूज... शहरी भागात वसलेले देशातील पहिले अन् महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 03:37 PM2022-08-13T15:37:04+5:302022-08-13T15:39:11+5:30
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे
ठाणे - भारतातील शहरी भागातील पहिले रामसर स्थळ म्हणून ठाणे खाडीला दर्जा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशातील पहिले आणि महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ घोषित करण्यात आले. त्यानुसार, ठाणे खाडीच्या जागेची ''रामसर कन्व्हेन्शनकडून आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ'' म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे, हे शहरी भागात वसलेले देशातील पहिले रामसर पाणथळ ठरले आहे.
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. या घोषणेमुळे ठाणे खाडीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले आहे. देशभरात महानगरातील विशेषत: मुंबई महानगर प्रदेशातील अशा प्रकारचा दर्जा मिळालेली ही पहिलीच पाणथळ जागा आहे. एकूण व्याप्त ६५२२.५ हेक्टरपैकी १६९०.५ हेक्टर हे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य (TCFS) असून, ४८३२ हेक्टर अभयारण्याचा अधिसूचित पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग (Eco Sensitive Zone) आहे. महाराष्ट्रातील ही पहीलीच सर्वाधिक मोठी पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित झाली आहे.
राज्यात सध्या नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर ८००.९६ हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर ४२७ हेक्टर ही दोन्ही ठिकाणे यापूर्वी जानेवारी आणि नोव्हेंबर २०२० मध्ये रामसर स्थळ म्हणून जाहीर झाल्या आहेत. ठाणे खाडीच्या ताज्या घोषणेमुळे राज्यात तीन रामसर साईट्स झाल्या आहेत.
रामसर कन्व्हेन्शनकडून केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयास (MOEFCC) शनिवारी या घडामोडीबाबत माहीती देण्यात आली. रामसर कन्व्हेन्शनने महिनाभराच्या आतच देशातील रामसर स्थळांबाबत केलेली ही दुसरी घोषणा आहे. नुकतेच देशातील १५ पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्या असून, महिनाभराच्या आत आणखी ११ रामसर स्थळ म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या ७५ झाली आहे. दक्षिण अशियातील कोणत्याही देशासाठी ही सर्वाधिक संख्या आहे.