गणेश मूर्तींच्या कृत्रिम तलावांमधील विसर्जनाला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 21, 2023 04:09 PM2023-09-21T16:09:53+5:302023-09-21T16:11:01+5:30
कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २०२ गणेश मूर्तींचे तसेच ११ सार्वजनीक गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावांत ९६८ तर विशेष टाकी व्यवस्थेत १०७७ गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निळकंठ वूड्स, मुल्ला बाग येथील कृत्रिम तलावाची पाहणी केली. छोट्या टाक्यांची आणखी सुविधा देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी मासुंदा तलाव येथील विसर्जन घाट आणि रायलादेवी तलाव येथील विसर्जन घाट येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच, पालायदेवी विर्सजन घाटाला नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १५ कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख आदी सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात एकूण ४२ ठिकाणी विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.