कसाऱ्यात चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:39 AM2021-04-11T04:39:13+5:302021-04-11T04:39:13+5:30
कसारा : वीकेंड लॉकडाऊनला कसाऱ्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवार सकाळपासूनच कसारा बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवेतील दूध वितरकांसह सर्वांनी ...
कसारा : वीकेंड लॉकडाऊनला कसाऱ्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवार सकाळपासूनच कसारा बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवेतील दूध वितरकांसह सर्वांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावर असलेली हॉटेल, रिसॉर्टही शुक्रवारी रात्री आठपासून बंद ठेवली. राज्य सरकारला पाठिंबा म्हणून व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, शहापूर उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, कसारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक व चारवर असलेल्या रेल्वे कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नियम मोडून रेल्वे कॅन्टीनमध्ये वस्तूंची विक्री होत होती. तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये विनामास्क विक्रेते विक्री करीत होते.