सरकारच्या आंतरजातीय विवाह योजनेला ठाण्यात चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:34 AM2020-11-21T00:34:10+5:302020-11-21T00:34:13+5:30
५० हजार अनुदान : तीन वर्षांत २८० जोडप्यांना आर्थिक साहाय्य
n स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य व केंद्र शासनाच्या आंतरजातीय विवाह योजनेला ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत विवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील २८० जोडप्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून यंदाही कोरोनाचा प्रसार असला तरी सुमारे २०० नवे प्रस्ताव यासाठी आलेले आहेत.
आंतरजातीय विवाह म्हटले की त्याला घरातून, समाजातून काही प्रमाणात का असेना विरोध होतो. पण जातीयता नष्ट करण्यासाठी ही योजना प्रोत्साहक ठरत आहे.
या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागात अर्ज केल्यास प्रत्येक जोडप्यास ५० हजार इतके अनुदान दिले जाते, परंतु शासनाकडून येणारे हे अनुदान दोन वर्षांपूर्वी रखडले होते. मात्र पाठपुरावा केल्यावर ते अनुदान
मिळाले.
पाठपुराव्यानेच मिळवले शासनाकडून अनुदान
योजनेला आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दोन वर्षांपूर्वी येणारे आर्थिक सहाय्य शासनाकडूनच मिळत नव्हते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून ते अनुदान मिळाले व रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले. 1
- रमेश अवचार,
जिल्हा समाज कल्याण अधिकारी,ठाणे.
याेजनेचा लाभ कोणाला?
आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहित जोडप्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. या जोडप्यापैकी एक व्यक्ती सवर्ण व एक मागासवर्गीय असणे आवश्यक आहे. त्यांनाच आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेच्या सवलती मिळतात. ही योजना अ.जा, अ.ज, वि.ज, भ.ज या आंतरप्रवर्गातील आंतरजातीयांना लागू होते. या जोडप्याला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.