"स्वच्छता ही सेवा" उपक्रमाला चांगला प्रतिसाद, हजारो ठाणेकर श्रमदानासाठी उतरले रस्त्यावर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 1, 2023 03:59 PM2023-10-01T15:59:34+5:302023-10-01T16:00:11+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३१० ठिकाणी स्वच्छतेसाठी नागरिकांनी श्रमदान केले.
ठाणे : एक तारिख, एक तास, एक साथ या मा. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता ही सेवा - श्रमदान उपक्रमात हजारो ठाणेकरांनी सक्रिय सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला. सोसायटी, शाळा, आरोग्य केंद्र, टीएमटीचे डेपो यांच्या आवारापासून, रस्त्यांवरील अस्वच्छ भागापर्यंत आणि उड्डाणपूलांच्या खालील जागांपासून ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत सकाळी १० वाजल्यापासून स्वच्छतेसाठी श्रमदानास सुरूवात झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३१० ठिकाणी स्वच्छतेसाठी नागरिकांनी श्रमदान केले.
उद्या २ ऑक्टोबर रोजी असलेल्या, महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी ‘स्वच्छता ही सेवा’ हे अनोखे अभियान जाहीर केले होते. हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची गेले आठवडाभर तयारी सुरू होती. स्वच्छतेसाठी जे जे करता येईल ते करावे आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल असे काही करू नये या मध्यवर्ती सूत्राभोवती ठाण्यातील कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्याने जसे काम करावे अशी आपली अपेक्षा असते तसे काम आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष करूया, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले होते.
सफाई कर्मचाऱ्यांविषयी आदर वाढेल - अभिजीत बांगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदानाचे आवाहन केले होते. त्यानुसार, नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३१० ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात नागरिकांच्या साथीने सन्माननीय लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्या सहभागी झाल्या.मुख्यमंत्री शिंदे यांनी, हा उपक्रम म्हणजे केवळ छायाचित्रासाठीचा उपक्रम न ठरता प्रत्यक्ष स्वच्छता झालेली दिसली पाहिजे, असे निर्देश दिले होते. सफाई कर्मचारी कोणत्या स्थितीत काम करतात याची जाणीव या निमित्ताने अधिकाऱ्यांना होईल. त्यांना वेगळा अनुभव मिळेल. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांची सजगता वाढेल आणि नागरिकांना स्वच्छता कर्मचाऱ्यांविषयी आदर वाढेल. हेच या उपक्रमातून अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.
स्वच्छता तिथेच आरोग्य नांदते - जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिकेसह सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता ही सेवा या उपक्रमात श्रमदानाचे आयोजन केले. त्यात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी श्रम करणे ही केवळ विशिष्ट लोकांचीच जबाबदारी नाही, त्यात सगळ्यांनीच सहभागी व्हायला हवे. महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा दिलेला संदेश त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा आठवून त्याप्रमाणे कृती करण्यासाठी आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच आरोग्य नांदते. त्यामुळे एक दिवसासाठी नव्हे तर कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी आपण कृतीशील राहूया, असे प्रतिपादन ठाण्याचे जिल्हाधिकारी . अशोक शिनगारे यांनी केले.
माजिवडा उड्डाणपूलाच्या खाली स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. माजिवडा उड्डाणपूलाच्या एका दिशेने सफाईची सुरुवात करून उड्डाणपूलाच्या अखेरपर्यंत सफाई मोहिम राबविण्यात आली. कचरा गोळा करून घंटागाडीत टाकण्यात आला. तर, माती, दगड, रॅबिट आदीचे ढीग तयार करण्यात आले. त्यात आमदार. संजय केळकर, माजी महापौर. नरेश म्हस्के, स्थायी समितीचे माजी. संजय भोईर, माजी नगरसेविका. उषा भोईर, महापालिका आयुक्त . अभिजीत बांगर, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे,. तुषार पवार, अनघा कदम, दिनेश तायडे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक आदी सहभागी झाले.ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही स्वच्छता अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला