कल्याण-डोंबिवलीत वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:52+5:302021-04-12T04:37:52+5:30
कल्याण : शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या वीकेंड लॉकडाऊनला शनिवारप्रमाणे रविवारीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सलग दुसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीतील मुख्य ...
कल्याण : शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या वीकेंड लॉकडाऊनला शनिवारप्रमाणे रविवारीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सलग दुसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांसह छोट्या गल्ल्यांमध्ये शुकशुकाट होता. नागरिकांसह वाहनांचीही वर्दळ कमी असल्याचे चित्र दोन्ही शहरांत हाेते. चौकाचौकांत बंदोबस्त लावण्यापासून ते गस्त घालून लॉकडाऊनचे काटेकोर पालन होते की नाही हे पाहण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त होती, तर केडीएमसीच्या पथकांचाही गस्तीद्वारे शहरातल्या स्थितीवर लक्ष होते.
शनिवारी रिक्षाचालकांशी पोलिसांचा वाद झाला होता. अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा चालविण्यास परवानगी असल्याने याचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रविवारी शहरांमधील रस्त्यांवर तुरळक प्रमाणात रिक्षा फिरताना दिसत होत्या. खासगी वाहनेही कमी होती. दुपारच्या सुमारास मुख्य चौकांसह रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. कल्याण शहरातील एपीएमसी मार्केटही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवले होते. पोळी-भाजी केंद्रे, हॉटेल पार्सल सुविधांसाठी खुली असल्याने त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ दिसली. केडीएमसीने लॉकडाऊनच्या कालावधीत दोन दिवस लसीकरण बंद ठेवले होते, तर खासगी रुग्णालयांतही लसीकरण बंद होते. सोमवारपासून डोंबिवली पूर्वेतील स. वा. जोशी विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार होते; पण लसीचा तुटवडा असल्याने हे केंद्र सध्या सुरू करणे शक्य नाही, असे माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी रविवारी सांगितले.
--------------------------------------------------------
फवारणीची विशेष मोहीम
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केडीएमसी परिक्षेत्रात सोडियम हायपोक्लोराईड फवारणी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी कल्याणमधील केडीएमसीच्या अ, ब आणि क प्रभाग क्षेत्रांत, तर डोंबिवलीतील फ, ग आणि ई या प्रभागक्षेत्रांत ही मोहीम राबविली गेली. रविवारी ड, जे, आय आणि ह प्रभागक्षेत्रांत ही फवारणी करण्यात आली. या मोहिमेत अकरा सिटी गार्ड वाहने, सात फायर फायटर वाहने, तसेच प्रत्येक प्रभागनिहाय हॅण्ड फॉग मशीनचा वापर करण्यात आला.
------------------------------------------------------
लॉकडाऊनमध्ये रक्तदान शिबिर
रविवारी लॉकडाऊनदरम्यान कल्याण शहरातील पूर्व-पश्चिम भागांत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभला. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला आयोजकांनी पत्रव्यवहार केला होता. याला पोलिसांकडून चांगले सहकार्य लाभले. पूर्वेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश तरे यांनी, तर पश्चिमेला केडीएमसी आणि निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन कल्याण डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर भरविले हाेते.