गुडविन ज्वेलर्समध्ये अडकले २१ कोटी, ७५० गुंतवणूकदारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:17 AM2019-11-16T01:17:07+5:302019-11-16T01:17:11+5:30
गुडविन ज्वेलर्सकडे गुंतवणूक केलेल्या तक्रारदारांची संख्या सुमारे ७५० वर पोहोचली आहे.
डोंबिवली : गुडविन ज्वेलर्सकडे गुंतवणूक केलेल्या तक्रारदारांची संख्या सुमारे ७५० वर पोहोचली आहे. या गुंतवणूकदारांचे डोंबिवलीतील विविध शाखांमध्ये २१ कोटी रुपये अडकले आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासाधिकारी शंकर चिंदरकर यांनी दिली.
काही गुंतवणूकदारांनी तपास विशेष पुढे जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी गुडविनच्या गांधीनगर येथील एका वास्तूचीही पाहणी करण्यात आली होती. त्यात काहीही न मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. डोंबिवलीतच २१ कोटींची गुंतवणूक अडकली असल्याचे चिंदरकर यांनी सांगितले. अन्य ठिकाणीही माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे रामनगर पोलीस ठाण्यात जाऊ न काहीच उपयोग होत नाही. तपासाधिकारीही नीट माहिती देत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार त्रस्त झाले असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेस गुंतवणूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालयावर लाँगमार्च काढण्याच्या विचारात असल्याचे काँग्रेसचे नेते संतोष केणे यांनी सांगितले.