गुडविन ज्वेलर्सचा कोट्यवधींचा गंडा; डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:02 AM2019-10-27T01:02:38+5:302019-10-27T01:02:56+5:30
पूर्वेतील मानपाडा रोडवरील गुडविन ज्वेलर्समध्ये मुदत ठेव, भिशी योजना आदींमध्ये गुंतवणूकदारांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
डोंबिवली : गुंतवणूकदारांना सुमारे १० कोटी रुपयांचा गंडा घालून शहरातील नामांकित गुडविन ज्वेलर्स पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून ज्वेलर्सची पेढी बंद होती. त्यामुळे सर्व गुंतवणूकदार शनिवारी सकाळी एकत्र आले. ज्वेलर्सच्या मालकाविरोधात त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी पेढीला सील ठोकले. तसेच दुकानमालक सुनील कुमार, सुधीश कुमार आणि व्यवस्थापक मनीष कुंडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातारवण आहे.
पूर्वेतील मानपाडा रोडवरील गुडविन ज्वेलर्समध्ये मुदत ठेव, भिशी योजना आदींमध्ये गुंतवणूकदारांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. अगोदर सोमवारी ही पेढी दोन दिवसांसाठी बंद राहील, असा कागदी फलक दुकानाच्या शटरवर लावला होता. मात्र, ऐन दिवाळीत पेढी बंद राहिल्याने चर्चेला तोंड फुटले. तसेच समाज माध्यमांवरही ज्वेलर्सचा मालक आपले सामान घेऊन पसार झाल्याचा मेसेज व्हायरल झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. दोन दिवस वाट पाहूनही दुकान न उघडल्याने गुंतवणूकदार शनिवारी सकाळी एकत्र आले. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्थानिक पोलीसही तेथे तैनात होते. यावेळी, दुकान मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय गुंतवणूकदारांनी घेतला. त्यानुसार सुमारे २०० ते ३०० गुंतवणुकदारांनी सह्यांचा तक्रारअर्ज रामनगर पोलीस ठाण्यात दिला. त्यानंतर पोलिसांनी पेढीला सील ठोकले. तसेच दोघा दुकानमालकांसह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा नोंदवला.
सोमवारी आम्हाला गुंतवलेले पैसे मिळणार, असे सांगण्यात आले होते. परंतु, पैसे नसल्याचे सांगत दोन दिवसांनी दुकान उघडल्यावर तुमचे पैसे परत देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तेव्हापासून शिवाजी पुतळ्यासमोरील आणि मानपाडा रोड येथील अशी दोन्ही दुकाने बंद आहेत. तसेच दुकानातील कर्मचारी व सहकाऱ्यांचे मोबाइलही बंद असून, कोणी काही सांगण्यास तयार नाही. - रिचर्ड वाज आणि सुनील पाटील (गुंतवणूकदार)
माझ्या मुलीचे लग्न करायचे असल्याने दोन वर्षांपूर्वी सात लाख रुपये ‘गुडविन’मध्ये जमा केले. लग्नासाठी दसºयाला दागिने घेण्याचे ठरल्यानंतर या दुकानात दागिने खरेदीसाठी गेलो. त्यावेळी, दिवाळीत नवीन माल येणार असून, तेव्हा दागिने खरेदी करा, असे सांगण्यात आले होते. - आरती म्हात्रे, गुंतवणूकदार
‘गुडविन’मध्ये दोन लाखांची मुदत ठेव ठेवली होती. तीन दिवसांपूर्वी सोन्याची खरेदी करण्यासाठी गेलो असता दुकानातील विद्युतपुरवठा बंद आहे, माल नाही, अशी कारणे देत नंतर यायला सांगितले. त्यानंतर जेव्हा दुकानात गेलो तेव्हा दुकानच बंद असल्याचे निदर्शनास आले. - ज्येष्ठ नागरिक
‘गुडविन’मध्ये दीड लाख रुपये गुंतवले होते. आई व बहिणीच्या आजारपणासाठी हे पैसे काढण्यासाठी गेलो असता त्यांनी मला उद्या या परवा या, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना आई व बहिणीच्या उपचारासाठी थोडीफार तरी रक्कम मला परत द्या, अशी विनवणी केली. परंतु त्यांनी नंतर येण्यास सांगितले. आता तर दुकानच बंद झाले. - मनोहर सुर्वे, गुंतवणूकदार