‘गुडविन ज्वेलर्स’च्या भागीदारांना आता डोंबिवलीच्या गुन्ह्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:01 PM2019-12-26T22:01:53+5:302019-12-26T22:06:13+5:30
‘गुडविन ज्वेलर्स’च्या फसवणुकीतील आमचे पैसे लवकर मिळवून द्या, अशी मागणी करून डोंबिवलीतील गुंतवणूकदारांच्या एका शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे गुरुवारी गा-हाणे मांडले. या सर्वांना पोलिसांकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी आयुक्तांनी या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘गुडविन ज्वेलर्स’चे मालक आणि या फसवणुकीतील मुख्य आरोपी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोन्ही भावांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने आता डोंबिवलीच्या गुन्ह्यामध्ये गुरुवारी अटक केली. दरम्यान, या फसवणुकीतील आमचे पैसे लवकर मिळवून द्या, अशी मागणी करून गुंतवणूकदारांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे गाºहाणे मांडले. या सर्वांना पोलिसांकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी आयुक्तांनी या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात अकराकरण बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला एक कोटी ७१ लाखांच्या फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाला होता. या दोघांनीही ठाणे न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर त्यांना सुरुवातीला या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर ठाणे न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत तीत वाढ मिळाली होती. या कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यानंतर त्यांना आता डोंबिवलीतील चार कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये न्यायालयाच्या परवानगीने अटक केली आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त फणसळकर यांची डोंबिवलीतील ‘गुडविन ज्वेलर्स’च्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी भेट घेतली. गुडविनच्या संपत्तीमधून लवकरात लवकर आमचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. न्यायालयीन प्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही या शिष्टमंडळातील गुंतवणूकदारांनी आयुक्तांना दिले. यावेळी पोलीस आयुक्तांनी अंबरनाथ तसेच डोंबिवलीतील गुंतवणूकदारांना सर्वांच्या सोयीने एखाद्या दिवशी बोलवून त्यादिवशी उर्वरित कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. त्याद्वारे आवश्यक ती माहितीही यावेळी गोळा करण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या वेळेमध्येही बचत होईल. तसेच न्यायालयाच्या मार्फतीने आरोपींच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसेही परत करण्यात येतील. पण, या सर्व प्रक्रियेला काहीसा वेळ लागणार असल्याचेही आयुक्त फणसळकर यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या वतीने गुंतवणूकदारांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.