डोंबिवलीतील गुडविनच्या दुकानाची तपासणी; दागिने मालकांकडून गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 02:09 AM2019-11-02T02:09:29+5:302019-11-02T06:46:41+5:30
पूर्वेकडील मानपाडा रोडवरील गुडविन ज्वेलर्समध्ये अनेकांनी भिशी योजना, फिक्स डिपॉझिटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
डोंबिवली : ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी डोंबिवलीतील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाचे सील फोडून तपासणी केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. परंतु, दुकानमालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांनी पसार होण्यापूर्वी दुकानातील बहुतांश दागिने गायब केल्याचे उघडकीस आले.
पूर्वेकडील मानपाडा रोडवरील गुडविन ज्वेलर्समध्ये अनेकांनी भिशी योजना, फिक्स डिपॉझिटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. ऐन दिवाळीत दुकान बंद करून मालक पसार झाल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी मालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच दुकानाला सील ठोकले.
परंतु, हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होताच शुक्रवारी या विभागाच्या पोलिसांनी डोंबिवलीतील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाचे सील तोडून आतील वस्तूंची तपासणी केली. दुपारी दोनच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या पथकाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष कारवाई सुरू केली. दुकानाचे कुपूल तोडण्यासाठी पाऊण तास लागला.
इलेक्ट्रिक कटरद्वारे मुख्य लॉक असलेला रॉडही कापण्यात आला. यावेळी गुंतवणुकदारांनीही मोठी गर्दी केली होती. दुकानाचे शटर तोडल्यावर पंचनामासाठी आलेल्या १५ जणांच्या पथकाने आतमध्ये शिरकाव करीत तपासणीला सुरुवात केली. यावेळी एकाही गुंतवणुकदाराला आतमध्ये येऊ दिले नाही. दुकानाबाहेर रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तैनात होते. दुकानाचे शटर आतमधून
लावून घेण्यात आले. ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे सविस्तर माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, शुक्रवारी डोंबिवली प्रमाणेच अंबरनाथ, नवी मुंबई, ठाण्यातही गुडविन ज्वेलर्सच्या दुकानांवर छापा टाकत पथकाने तपासणी सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गुडविन ज्वेलर्स दुकानामध्ये पंचनाम्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याची माहिती शहरात पसरताच गुंतवणूकदारांनी मानपाडा येथील दुकानाकडे धाव घेतली. दुकानाच्या आत दागिने आहेत की नाही, अशी उत्सुकता गुंतवणुकदारांना लागली होती. परंतु, ज्वेलर्सच्या मालकांनी २१ आॅक्टोबरला हे दुकान बंद केले. तत्पूर्वीच त्यांनी दुकानातील सर्व दागिने गायब केल्याचे उघड होताच गुंतवणूकदारांच्या चेहºयावर निराशाचे भाव दिसून आले. परंतु, पोलिसांच्या पथकाकडून दागिने नसल्याच्या मुद्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
गुडविन ज्वेलर्समध्ये आतापर्यंत २९० गुंतवणूकदारांची सुमारे २० कोटींची फसवणूक झाली असून डोंबिवलीतील दोनपैकी एका दुकानात शुक्रवारी दिवसभर घेतलेल्या झडतीमध्ये सोन्याचा मुलामा असलेले अवघे ४० ते ५० हजारांचे दागिने तपास पथकाच्या हाती लागले आहेत. ठाणे पोलिसांचे एक पथक केरळ येथेही रवाना झाले असून पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यातच बैठक घेऊन या गुन्ह्याचा आढावा घेतला.
मिळाले अवघे ५० हजारांचे दागिने
ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या ५० जणांच्या एका पथकाने गुडविन ज्वेलर्सच्या डोंबिवलीतील दुकानांमध्ये झडतीसत्र राबविले. १ नोव्हेंबर रोजी दिवसभर चाललेल्या या धाडसत्रामध्ये केवळ सोन्याचा मुलाचा असलेले काही दागिने या पथकाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुकानात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे फसवणुकीचा तपास करण्यात आला. दरम्यान, पलावा गोल्ड सिटीतील सेरिनो इमारतीमधील २०१ क्रमांकाची सदनिका तसेच एका दुकानामध्ये गुडविनचा संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार अकराकरण यांची मालकी असल्याचे आढळले आहे. या मालकीबाबतची कल्याण डोंबिवली महापालिका तसेच महसूल विभागाकडून खातरजमा करण्यात येत आहे. ही मालमत्ता कोणीही खरेदी न करण्यासाठी तसेच तिची विक्री न होण्यासाठी कायदेशीर बाबीही प्राधान्याने करण्यत येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. याव्यतिरिक्त पलावामधील ३०१ क्रमांकाची सदनिकाही सुनीलकुमारने भाड्याने घेतली होती. ती मूळ मालकाला मिळण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे.
प्रत्येकाची तक्रार घ्या
शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासोबत नौपाडा पोलीस ठाण्यात बैठक घेऊन या गुन्ह्याचा आढावा घेतला. येणाºया प्रत्येक तक्रारदाराची फिर्याद घेऊन त्याला योग्य तो न्याय देण्यासाठी पुराव्यांची आणि आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जावेत, असे आदेश यावेळी पोलीस आयुक्तांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केरळमधील मालमत्तेचा तपास
आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी दुपारी केरळ येथील आरोपींच्या त्रिच्चुर या मूळ जिल्ह्यातही रवाना झाले आहे. त्यांनी तिथे कुठे कुठे गुंतवणूक केली? त्यांचे मित्र, नातेवाईक या सर्वांची माहिती या पथकाकडून घेण्यात येत आहे.