गुगल दाखविणार शहरातील सार्वजनिक शौचालये, शहरात 11 हजार 217 शौचालये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 08:06 PM2017-09-08T20:06:16+5:302017-09-08T20:06:26+5:30
हगणदारीमुक्त ठाणे करण्यासाठी पालिकेने आता थेट गुगलची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील तब्बल 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे.
ठाणे, दि. 8 - हगणदारीमुक्त ठाणे करण्यासाठी पालिकेने आता थेट गुगलची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील तब्बल 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उघड्यावर शौच करण्याऐवजी ठाणेकरांनी गुगलची मदत घेऊन सार्वजनिक शौचालयांचा लाभ घ्यावा हा मूळ उद्देश असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
एखाद्या गावाची माहिती, एखाद्या दिग्गज नेत्याची माहिती किंवा हॉटेल, मॉल, सिनेमागृह आदींसह इतर माहिती देण्यासाठी प्रचलित असलेले गुगल आता शहरातील सार्वजनिक शौचालयांची माहिती देखील उपलब्ध करून देणार आहे. केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता ठाण्यातील सर्व सार्वजनिक शौचालये ही गुगलवर दिसणार आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे शहराला हगणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने आता हे पाऊल उचलले आहे. ठाणे महापालिका अंतर्गत येणारे 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांना आता टॉयलेट लोकेटरद्वारे गुगलवर टाकले जाणार आहे. यासाठी क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या (क्यू. सी .आय.) माध्यमातून संपूर्ण खर्च केला जाणार आहे.
शहरातील सार्वजनिक शौचालये गुगल मॅपद्वारे टॉयलेट लोकेटर बसविण्यासाठी 1 कोटी 98 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच ही सेवा सुरू केल्यानंतर यामध्ये 5 पेक्षा जास्त त्रुटी आढळून आल्यास पुन्हा त्यात सुधारणा करण्यासाठी 60 हजारांचा खर्च येणार आहे. असा एकूण 2 कोटी 58 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यावर नवीन करप्रणालीनुसार 18 टक्के जीएसटी लागणार असल्याने त्यात आणखी वाढ होऊन हा खर्च 3 कोटी 4 लाख 440 रुपये एवढा आता अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या खर्चापैकी 80 टक्के रक्कम कार्यादेश दिल्यानंतर आगाऊ देण्यात येणार असून उर्वरित 20 टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यावर दिली जाणार आहे. त्यानुसार आता येत्या 2 ऑक्टोबर र्पयत ही शौचालये गुगल मॅपला जोडली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
चौकट - पालिकेने मागील वर्षी केलेल्या शौचालयांच्या सव्र्हेत 3092 घरे ही सामुहीक शौचालयचा वापर करीत असून उर्वरित 60 हजार 198 घरे ही सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. दरम्यान, 6968 कुटुंबे म्हणजेच प्रत्येक कुटुंबातील 5 सदस्य पकडले असता, सुमारे 48 हजार जण हे उघडय़ावर प्रात:विधीसाठी जात असल्याची माहिती या सव्र्हेतून समोर आली होती. परंतु आता गुगल मॅपला ही शौचालये जोडली जाणार असल्याने याचे प्रमाण कमी होईल असा कयास पालिकेने लावला आहे.