गोरेगावात 800 अल्पसंख्याकांनी केला शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:30 PM2021-02-16T17:30:15+5:302021-02-16T19:06:02+5:30
सुभाष देसाई यांनी अल्पसंख्याक समाज बांधवांना दिलासा देत सांगितले की, शिवसेना पक्ष कधी जात-पात मानत नसून प्रामाणिक निष्ठेने सामाजिक कार्य करणार्या तळागाळातील कार्यकर्त्याला कुठलाही भेदभाव न करता संधी देते
मनोहर कुंभेजकर
मुंबई : आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीला अजून सुमारे एक वर्ष बाकी असतांना विविध जाती धर्माचे नागरिक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. अलिकडेच चारकोप येथील अनेक अल्पसंख्याक बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला असतांना, शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे 800 अल्पसंख्याक बांधवांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. गोरेगांव पश्चिम, संस्कार धाम विद्यालयाच्या पटांगणात "समस्यांवर समाधान" या शिर्षका अंतर्गत शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक समाजाचे समाजसेवक हनीफ मलबारि उर्फ अन्नु मलबारी यांनी हजारों मुस्लिम बांधवांसहित शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी सुभाष देसाई यांनी अल्पसंख्याक समाज बांधवांना दिलासा देत सांगितले की, शिवसेना पक्ष कधी जात-पात मानत नसून प्रामाणिक निष्ठेने सामाजिक कार्य करणार्या तळागाळातील कार्यकर्त्याला कुठलाही भेदभाव न करता संधी देते.अल्पसंख्याक समाजाच्या काही समस्या शिवसेनाप्रमुखांनी चुटकीसरशी कशा सोडविल्या या आठवणींना उजाळा देत प्रकाश टाकला व त्यांनी समाजाची मने जिंकून घेतली.
इस्तेमाह करिता मैदान उपलब्ध होत नसल्याची समस्या घेऊन आलेल्या काही अल्पसंख्याक नेत्यांना शिवसेनाप्रमुखांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना आदेश देत बीकेसी येथिल मैदान केवळ एका फोनवर क्षणात कसे उपलब्ध करुन दिले. त्याचप्रमाणे हज यात्रेकरिता परराज्यातून येणाऱ्या समाज बांधवांकरिता बांधलेले हज हाऊस दिर्घ कालावधीपासून बंद अवस्थेत पडले आहे ही समस्या लक्षात येताच तातडिने हज हाऊस सुविधांसहित सुरु करण्याचे आदेश शासनाला युती शासनाला शिवसेनाप्रमुख देताच हज हाऊस पुन्हा सुरु झाले असे अनेक दाखले मंत्री महोदयांनी पक्ष प्रवेशकर्त्या अल्पसंख्याक बांधवांना देत त्यांना आत्मविश्वास दिला व आश्वासित केले. अल्पसंख्याक बांधवांना पक्षात मानसन्मान ,सच्चे प्रेम, व भाईचारा मिळेल. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी एसआरएच्या समस्यांवरही सविस्तर संबोधन करत या प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनदरबारी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करण्याचे मंत्रीमहोदयांनी आश्वासन दिले.
या प्रसंगी समाजसेवक हनीफ मलबारी उर्फ अन्नु मलबारी यांनी आपल्या भाषणात उद्योगमंत्र्यांचे आभार मानत शिवसेना पक्ष प्रवेशाकरिता सलग तीन महिने संपर्कात असणारे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांचा उल्लेख केला. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत अल्पसंख्याक समाज पूर्ण ताकदिनिशी शिवसेना पक्षासोबत ठामपणे उभा राहिल व कसोशिने झटून गोरेगांव विधानसभेत शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडुन देण्या करिता कटिबध्द राहू असे आश्वासन दिले. यावेळी विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलिप शिंदे, विधानसभा संघटक व माजी नगरसेवक राजू पाध्ये, विधानसभा समन्वयक दिपक सुर्वे, विधानसभा उपसमन्वयक अजय नाईक, मा़जी नगरसेवक समीर देसाई, महिला विधानसभा संघटक,माजी नगरसेविका लोचना चव्हाण, शशांक कामत, अशरफ अली खान, लक्ष्मी भाटीया, शबाना ठाकूर व इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.