पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:09 AM2018-10-29T00:09:40+5:302018-10-29T00:10:00+5:30
पाण्यासाठी बारवीमध्ये आरक्षण मिळाले. योजना सुरू करण्यासाठी अमृत योजनेतून निधीही मिळाला. मात्र, असे असले तरी पाण्याची कोंडी मात्र अजूनही कायम आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरमधील पाणीसमस्या सोडवण्यासाठी बारवी धरणातून ५० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्थात, हे पाणी घेण्यासाठी दोन्ही पालिका क्षेत्रात जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी लागणारा निधीही सरकारने मंजूर केला आहे. पाण्यासाठी बारवीमध्ये आरक्षण मिळाले. योजना सुरू करण्यासाठी अमृत योजनेतून निधीही मिळाला. मात्र, असे असले तरी पाण्याची कोंडी मात्र अजूनही कायम आहे. वाढीव पाणी मिळत असले, तरी जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मात्र ठोसपणे होत नाही. त्यामुळे प्राधिकरणाने आधी ही पाणीकोंडी सोडवणे गरजेचे आहे.
बारवी धरणात उंची वाढल्याने ४८८ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाण्यातून काही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. त्यात अंबरनाथसाठी २४ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे, तर बदलापूरकरिता २६ दशलक्ष लीटर पाणी मंजूर करण्यात आले आहे. आजघडीला बदलापूर शहरासाठी जीवन प्राधिकरणामार्फत ४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.
बदलापूरची वाढती लोकसंख्या पाहता हा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे बदलापूरला अतिरिक्त पाण्याची गरज भासत होती. बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या कामानिमित्ताने बदलापूरला अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, बारवी धरणातून नेमके किती पाणी मिळणार, याबाबत कुणालाच शाश्वती नव्हती. बदलापूरला सरकारने २६ एमएलडी पाणी मंजूर केल्याने पुढील २० वर्षांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. मात्र, इतके पाणी उपलब्ध होणार असले, तरी त्याचे नियोजन करण्यासाठी जीवन प्राधिकरण कमी पडत आहे. वाढीव पाणी मिळणार असले, तरी अजूनही वितरणाचे नियोजन झालेले नाही.
अंबरनाथच्या लोकसंख्येचा विचार करता ७० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे, तर बदलापूरला ५२ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. सोबत, अंबरनाथच्या आयुध निर्माणी कारखान्याला नऊ दशलक्ष लीटर पाणी देणे बंधनकारक आहे. या तिन्हींचा विचार करता आजघडीला अंबरनाथ आणि बदलापूरसाठी १३१ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. जीवन प्राधिकरण त्या अनुषंगाने बॅरेज धरणातून ९० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे, तर एमआयडीसीकडून १००, भोज धरणातून सहा आणि चिखलोली धरणातून सहा असे एकूण ११२ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होते. मात्र, गरजेपेक्षा २० दशलक्ष लीटर पाणी कमी पडत असल्याने प्राधिकरणाने ३० दशलक्ष लीटर पाण्याची तत्काळ मागणी केली होती. या मागणीच्या प्रमाणात सरकारने दोन्ही शहरांसाठी एकूण ५० दशलक्ष लीटर पाणी मंजूर केले आहे. मात्र, असे असले तरी वितरणव्यवस्थेत सुधारणा अजूनही झालेली नाही. त्यामुळे बदलापूरमध्ये उल्हास नदीवर उपसाविहीर बांधण्यासाठी १०८ दशलक्ष लीटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, ३४ किलोमीटरच्या वितरणवाहिन्या टाकणे, सात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित करत त्यासाठी ६३ कोटींची योजना तयार केली होती. त्या योजनेलाही मंजुरी दिली असून आता बदलापूरमधील वाढीव पाण्यासोबत वितरणव्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
या योजनेत बदलापूर पूर्व भागात मानकवली, एमआयडीसी शिरगाव, मॅरेथॉननगरी, कीर्ती पोलीसलाइन या भागात, तर पश्चिम भागात बौद्धवाडा, ठाकूरवाडी, सोनवली, वालिवली, वडवली असे नऊ नवीन जलकुंभ प्रस्तावित आहेत.
प्राधिकरणाने सक्षम होणे गरजेचे
याआधीही नगरोत्थान योजनेतून आणि अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात निधीची तरतूद केली होती. तरीही, वितरणव्यवस्थेत तीळमात्र सुधारणा झालेली नाही. अनेक वर्षे पाणी नाही, अशी बोंब मारून पाणीटंचाईचे कारण पुढे केले जात होते. मात्र, आज परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. तरीही, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राधिकरणाने सक्षम होणे गरजेचे आहे.