सुगंधी वृक्षलागवडीवरून प्रशासन येणार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:03 PM2018-08-23T23:03:52+5:302018-08-23T23:04:16+5:30
मिलिंद पाटणकर यांनी मागितली माहिती; ठामपा प्रशासनापुढे पेच
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुगंधी वृक्षलागवड करण्यात येणार असून यासाठी सुमारे १० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. परंतु, याच विषयाच्या अनुषंगाने मागील पाच वर्षांत पालिकेने किती वृक्ष लावले, किती जगवले, कितींना तोडण्याची परवानगी दिली, यासह इतर प्रश्नांची उत्तरे आता वृक्ष प्राधिकरण विभागाला द्यावी लागणार आहे. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी याबाबत प्रशासनाला पत्र लिहून माहिती मागितली आहे. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून हा मुद्दा महासभेत चांगलाच गाजणार आहे.
आता याच विषयाच्या अनुषंगाने पाटणकर यांनी काही प्रश्न प्रशासनाला केले असून त्याची उत्तरे आता त्यांना महासभेत द्यावी लागणार आहेत. पाच वर्षांत जी पाच लाख झाडे लावलीा, त्याचा तपशील म्हणजे ठिकाण, लावलेली झाडे व त्यासाठीचा खर्च, झाडे तोडण्यासाठीची परवानगी देताना वृक्ष तोडणाऱ्यास पाच आणि आता १५ झाडे लावण्याची अट असते, याअंतर्गत किती व कोठे झाडे लावली आहेत, त्यांच्या निगा, देखभालीसाठी वृक्ष प्राधिकरण झाडामागे निधी / दंड घेते. असा किती निधी आतापर्यंत जमा झाला व त्याचा उपयोग कोठे, कसा करण्यात आला, असे प्रश्न पाटणकर यांनी उपस्थित करून त्याची माहिती देण्याची मागणी केली आहे.
सुगंधी वृक्षलागवड, देखभालीसाठी १० कोटी
महापालिका दरवर्षी एक लाख वृक्षांची लागवड करते. परंतु, त्यापैकी किती जगले आणि किती मृत पावले किंवा किती वृक्षतोडीला परवानगी दिली, याची पूर्ण माहिती पालिकेकडे सध्या तरी उपलब्ध नाही.
त्यातही निगा-देखभालीच्या नावाखाली पालिका कोट्यवधींचा खर्चही करत आहे. त्यात आता नव्याने एक लाख सुगंधी वृक्षांची लागवड करणार असून निगा आणि देखभालीसाठी १० कोटींचा खर्च करणार आहे.