कळव्याच्या सी लिंकला अखेर शासनाची मान्यता
By admin | Published: July 8, 2015 12:19 AM2015-07-08T00:19:49+5:302015-07-08T00:19:49+5:30
मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या सागरी सेतूला (सी लिंकला) अखेर राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे.
ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या सागरी सेतूला (सी लिंकला) अखेर राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे या खाडीवर तिसरा आणि अतिशय महत्त्वांकाक्षी प्रकल्प येत्या काळात मार्गी लागणार आहे. या सेतूसाठी १८३ कोटींचा खर्च
अपेक्षित धरला असून त्याचे डिझाईनदेखील अंतिम झाले आहे. येत्या दोन महिन्यात त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होणार असल्याचा
दावा ठाणे महापालिकेने केला
आहे.
ठाण्याकडून बेलापूर आणि खारेगावकडे जाणारी वाहतूककोंडी या सेतूमुळे फुटणार असून एकेरी
वाहतूक या पुलावरुन केली जाणार आहे. तर ठाण्याच्या दिशेने
येणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलावरुन एकेरी वाहतूक होणार असून ब्रिटीशकालीन पूल हा पादचाऱ्यांसाठीच राखीव ठेवला जाणार आहे. विशेष म्हणजे नव्या सेतूवर सुद्धा पादचाऱ्यांसाठी मार्गिका उभारण्यात येणार आहे.
विटावा पुलाखालील आणि खारेगावकडे जाणारी वाहतूककोंडी सुटावी यासाठी या सेतूचा
प्रस्ताव पालिकेने २०११ मध्ये पुढे आणला. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि एक पालिकेने बांधलेला पूल आहे. परंतु, ब्रिटीशकालीन पुलाची अवस्था दयनीय झाल्याने सध्या तो केवळ पादचाऱ्यांसाठी आणि दुचाकीसाठीच खुला ठेवला आहे. त्यामुळे नव्या पुलावर वाहतूककोंडी होतांना
दिसते. त्यामुळेच पालिकेने या नव्या सागरी सेतूची संकल्पना पुढे
आणली. त्यानुसार २०११ च्या अंदाजपत्रकात १० कोटींची तरतूद केली होती. तसेच २०१२ मध्ये महासभेनेदेखील त्याला मंजूरी
दिली. सुरुवातीला सादर केलेल्या प्रस्तावात काहीसे बदल तत्कालीन आयुक्तांनी सुचविल्यानंतर पुन्हा या प्रकल्पावर काम सुरु झाले. परंतु, मेरीटाईम बोर्ड आणि इतर
परवानग्या घेण्यात काहीसा विलंब झाल्याने या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले होते. दरम्यान आता मागील आठवड्यात राज्य शासनाकडे झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने आता येत्या दोन महिन्यात त्याला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर म्हणजे हायटाईडपेक्षा सुमारे १२ मीटर उंचीवर हा सागरी सेतू
उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच बेलापूर दिशेला अशा दोन्ही मार्गाने तो खाली उतरणार आहे.