उत्तन व भाईंदर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाची मदत
By धीरज परब | Published: August 6, 2023 03:55 PM2023-08-06T15:55:42+5:302023-08-06T16:14:13+5:30
उत्तन व भाईंदर येथील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासना कडून प्रत्येकी चार लाखांची मदत तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे .
मीरारोड - उत्तन व भाईंदर येथील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासना कडून प्रत्येकी चार लाखांची मदत तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे .
उत्तनच्या पातान बंदर कोळीवड्यात १४ जुलै रोजी मच्छिमार कुटुंबाच्या राहत्या घराच्या छताचे प्लास्टर कोसळून सुनीता बोर्जीस ह्या मरण पावल्या होत्या. तर २० जुलै रोजी भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानक समोरील नवकीर्ती प्रिमायसेस ह्या ४० पेक्षा जास्त वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून बूट पॉलिश काम करणाऱ्या दुर्गा अवधेश राम यांना जीव गमवावा लागला होता.
दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासना कडून आर्थिक मदत देण्याचे जाहीर करून ती लवकरात लवकर मिळावी ह्यासाठी आमदार गीता जैन व अपर तहसीलदार निलेश गौंड यांनी पाठपुरावा चालवला होता . त्यानुसार शासना कडून मदत मंजूर होऊन त्याचे धनादेश तयार झाले.
शनिवार ५ ऑगस्ट रोजी आ. जैन व अपर तहसीलदार गौंड यांनी उत्तन येथे मयत सुनीता बोर्जीस यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची विचारपूस करत ४ लाखांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. उत्तन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश मसाळ, माजी नगरसेवक एलायस बांड्या व मच्छीमार उपस्थित होते. तर मयत दुर्गा राम यांची पत्नी व मुलाच्या हाती ४ लाखांचा धनादेश भाईंदरच्या अपर तहसीलदार कार्यालयात आ. जैन आणि अपर तहसीलदार गौंड यांच्या हस्ते देण्यात आला.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या दुर्दैवाने मृत्यू बद्दल दुःख व्यक्त करत उपस्थितांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. भविष्यात गरज लागेल तेव्हा मदतीसाठी तत्पर राहण्याचे आश्वासन देण्यात आले.
उत्तन येथील दुर्घटनाग्रस्त घरातील कुटुंबियांना घरकुल योजनेंतर्गत तसेच मोडकळीस आलेल्या घरे किंवा इमारतीतल्या रहिवाश्यांचे लवकरात लवकर स्थलांतर व्हावे म्हणून इमारती उपलब्ध होण्या करता प्रयत्न करणार असल्याचे ल आ. गीता जैन यांनी सांगितले.