शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध : रवींद्र चव्हाण, कोकणातील 150 शिक्षकांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 04:28 PM2018-09-30T16:28:17+5:302018-09-30T16:33:34+5:30
कोकणातील 150 शिक्षकांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाणे : राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्यमंत्री व भाजपचे संपर्क नेते रवींद्र चव्हाण यांनी आज दिली.
भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडीच्या वतीने विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मरणार्थ वसंतस्मृती आदर्श पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात कोकणातील 150 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार अॅड. निरंजन डावखरे होते. या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर संत, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, प्राचार्य नरेंद्र पाठक, राजेंद्र रजपूत, शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष शब्बीर शेख, विकास पाटील, जिल्हाध्यक्ष एन. एम. भामरे आदी उपस्थित होते. या वेळी नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देश घडविण्याचे कार्य सुरु आहे. तर शिक्षकांकडून उज्जवल समाजाची निर्मिती सुरू आहे. अशा शिक्षकांचा सन्मान होत असल्याबद्दल राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या नावाने सुरु केलेल्या वसंतस्मृती पुरस्कारामुळे शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. दिवंगत डावखरे यांनी शिक्षकांबरोबरच सर्वच स्तरांतील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, असे गौरवोद्गार राज्यमंत्री चव्हाण यांनी काढले. शिक्षकांनी आदर्श कार्य केल्यामुळेच पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड झाली. यापुढील काळातही आपल्या शाळेबरोबरच गुणवंत समाज शिक्षकांनी घडवावा. शिक्षकांच्या कार्याची सरकारकडून नेहमीच दखल घेतली जात असून, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्यमंत्र्यांनी दिली. बदलत्या काळात गुरु-शिष्याचे नाते आणखी दृढ करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडून नेहमी सहकार्य राहील, असे आश्वासन नरेंद्र पाटील यांनी दिले. प्रत्येक मुलातील गुण हेरण्याचे कार्य शिक्षकांकडून केले जाते. तर मुलांमधील उत्सूकतेला केवळ शिक्षकांकडूनच न्याय दिला जातो, बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारत शिक्षकांकडून समर्थपणे जबाबदारी पेलली जात आहे, याबद्दल खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `सब का साथ सबका विकास'नुसार शिक्षकांकडूनही समाजाच्या उन्नतीचे कार्य केले जात आहे. कोकणातील पाच जिल्ह्यात समाज घडविण्याच्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार सुरु केला. या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच मुले व संस्थेचाही सत्कार होत आहे. या माध्यमातून शिक्षकांच्या गौरवाची संधी आम्हाला मिळाली, असे स्वागताध्यक्ष आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले. या वेळी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे यांचा सत्कार करण्यात आला. तर ठाणे व पालघर जिल्ह्यातील 26 अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांच्या वतीने आमदार अॅड. निरंजन डावखरे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार डावखरे यांच्या पाठपुराव्याने 26 अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना पूर्णवेळ नोकरी मिळाली आहे.
----------------------------------------------------------
शिक्षकांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक : डावखरे
राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे. अर्धवेळ ग्रंथपाल, अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना पूर्ण वेळ सेवेत घेण्यात आले. तर शाळांना 20 टक्के अनुदानासह शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची सकारात्मक भूमिका आहे, असे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले.