शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने, नुकसानभरपाई मिळाली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:12 AM2019-11-27T01:12:43+5:302019-11-27T01:12:58+5:30
शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.
भातसानगर - शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षीची तुटपुंजी मदत कृषी विभागाकडे जमा झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली. ही रक्कम मागीलवर्षीची होती असा शेतक-यांचा समज झाला. मात्र चौकशीअंती ही २०१७ च्या आॅक्टोबर ची पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत असल्याचे स्पष्ट झाले.
मागीलवर्षी आॅगस्टमध्येच पाऊस गेल्याने माळरानातील भातशेती पार होरळून गेली होती. या नुकसानीचे पंचनामे होण्याच्या मागणीसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्या नंतर कृषी विभाग यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामेही केले होते. ५० टक्के नुकसान झाल्याचेही तहसीलदार यांनी जाहीरही केले. मात्र सरकारदरबारी याची कोणत्याच प्रकारची दखल घेतली न गेल्याने तालुक्यातील शेतकºयांना एक दमडीही मंजूर करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.
मागीलवर्षी २१९ गावांमध्ये १५ हजार ७२३ हेक्टर पिकाखाली होते. २७ हजार ४४२ शेतकºयांना याचा फटका बसला होता. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान शेतकºयांचे झाले होते.
मात्र पंचनामे होऊनही शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. २०१७ च्या आॅक्टोबरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम २ कोटी ३८ लाखांचे काही महिन्यांपूर्वी वाटप करण्यात आले. यामध्ये २६ हजार ७१८ शेतकºयांना ती वाटप करण्यात आली. मात्र मागीलवर्षीची नुकसानभरपाई मंजूर झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
यावर्षी ३३ टक्के नुकसानीचा अहवाल देण्यात आला असून पिकाखाली क्षेत्र १७ हजार २९.१२ तर नुकसानग्रस्त क्षेत्र ११ हजार ७७६.६७ हेक्टर इतके असून २४ हजार १९० शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. यासाठी हेक्टरी ८ हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केल्याने शेतकरी निराश झाला आहे.
मागीलवर्षी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकºयांना सरकारकडून देण्यात आली नाही.
- जे. एस.जायभाय, प्रभारी तालुका कृषी अधिकारी