ठाणे खाडीकिनारा मार्गावरून सरकारची कोंडी; नियमबाह्य कंत्राटावरून सत्ताधारी- विरोधक एकजूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:35 IST2025-03-19T07:35:10+5:302025-03-19T07:35:50+5:30
भाजप आ. प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आवश्यक परवानग्यांपूर्वीच एमएमआरडीएने २७०० कोटींचे कंत्राट आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दिल्याचा आरोप केला. त्यावर पर्यावरणमंत्री शंभूराज देसाई यांनी खाडीकिनारा मार्ग प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आल्याचे सांगितले.

ठाणे खाडीकिनारा मार्गावरून सरकारची कोंडी; नियमबाह्य कंत्राटावरून सत्ताधारी- विरोधक एकजूट
मुंबई : ठाण्यातील घोडबंदर मार्गाला समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडीकिनारा मार्गासाठी नियमबाह्य कंत्राट देण्यात आले. या प्रकल्पाचा खर्च तिपटीने वाढला आहे. ते रद्द करून त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करीत मंगळवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी सरकारची कोंडी केली.
भाजप आ. प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आवश्यक परवानग्यांपूर्वीच एमएमआरडीएने २७०० कोटींचे कंत्राट आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दिल्याचा आरोप केला. त्यावर पर्यावरणमंत्री शंभूराज देसाई यांनी खाडीकिनारा मार्ग प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आल्याचे सांगितले.
अनियमितता नाही : मंत्री
ठाणे महानगरपालिकेतर्फे २०२१ मध्ये पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.
त्यानुसार प्रकल्पाची १३१६.१८ कोटी इतकी रक्कम अंदाजित होती. त्यानंतर एमएमआरडीएने २०२४ मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. त्यानुसार प्रकल्पाची ३,३६४.६२ कोटी इतकी किंमत झाली.
प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, या प्रकल्पात कोणतीही अनियमितता झाली नाही, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. '
चौकशीची मागणी
आ. दरेकर यांनी प्रकल्पाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तर, उद्धवसेनेचे सचिन अहिर यांनी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली.