प्रत्येक गरजूच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबध्द- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By जितेंद्र कालेकर | Published: November 27, 2023 09:27 PM2023-11-27T21:27:22+5:302023-11-27T21:27:53+5:30

झोपडपट्टी मुक्त शहरासाठी जलद गतीने प्रकल्प मंजूर करणार: ४०० कुटूंबीयांना मिळाली एसआरए प्रकल्पातील हक्काची घरे

Government is committed to fulfill the dream of every needy's right to have a house - Chief Minister Eknath Shinde | प्रत्येक गरजूच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबध्द- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रत्येक गरजूच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबध्द- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: झोपडपट्टी पुनर्विकास योजनेबरोबरच क्लस्टरलाही चालना दिली. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त शहरासाठी जलद गतीने प्रकल्पांना मंजूरी दिली जात आहे. चांगल्या दर्जाचे स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न आज ४०० कुटूंबीयांचे पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ४० लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक ३७७ मौजे पाचपाखाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता ४०० सदनिका आणि १०० गाळयांच्या चाव्याच्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआर) चे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्याने ठाण्यातील गरजूंना लवकर घरे मिळतील. संपूर्ण एमएमआर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू केली. शासनाने लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले.
शासनाची महत्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू केली. दहा हजार घरांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करीत आहोत. नियम-कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करीत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रकल्पात ४०० घरे आणि १०० दुकानांसह व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही आहेत. या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राहणे, परिसर स्वच्छ ठेवणे, ही सर्वांची जबाबदारी आहे.

वातावरण चांगले ठेवले की सर्वच चांगले होते. समरीन ग्रुप ने वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक मुश्ताक शेख यांचे अभिनंदन करुन मुंबई-ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचेही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. जगन्नाथ या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकेच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

Web Title: Government is committed to fulfill the dream of every needy's right to have a house - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.