भिवंडी लोकसभा मतदार संघात शासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज...
By नितीन पंडित | Published: June 3, 2024 05:46 PM2024-06-03T17:46:39+5:302024-06-03T17:46:57+5:30
सोमवारी मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची रंगीत तालीम घेण्यात आली.
भिवंडी:भिवंडी लोकसभा मतदार संघात शासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. २० मे रोजी पार पडलेल्या मतदान वेळी एकूण १२ लाख ५० हजार ७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नोंदवला आहे. मंगळवारी मतमोजणी पडघा कल्याण रस्त्यावरील सावद गाव येथील के. यू. डी. बिझनेस क्लस्टर या गोदाम संकुलात सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी सोमवारी मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची रंगीत तालीम घेण्यात आली.
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात सहाही विधानसभा मतदार संघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात एकूण १४ टेबल लावण्यात आले आहेत, तर मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी २१ टेबल असणार आहेत. तर टपाली मतदान मतपत्रिका मोजणीसाठी १४ टेबल, अत्यावशक सेवेतील कर्मचारी व गृह मतदान यांचे मतमोजणी एक टेबल, असे एकूण १०६ मतमोजणी टेबलांवर मतमोजणी होणार आहे. यामध्ये गृह मतदान, दिव्यांग मतदान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे एकूण ४२६३, मतदान आहे, तर सर्विस वोटरची संख्या ११६ आहे. एकूण ४३८९ टपाली मतपत्रिका मतमोजणी करण्यात येणार आहे.
भिवंडी ग्रामीण विधानसभेसाठी २५ फेऱ्या, शहापूर विधानसभेसाठी २४ फेऱ्या, भिवंडी पश्चिम विधानसभेसाठी २२ फेऱ्या, भिवंडी पूर्व विधानसभेसाठी २३ फेऱ्या, कल्याण पश्चिम विधानसभेसाठी २९ फेऱ्या आणि मुरबाडसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. जास्तीत जास्त मतमोजणीच्या एकूण २९ फे-या होणार आहेत.
प्रत्येक मतमोजणी टेबलवर मतमोजणीसाठी एक निरीक्षक,एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई, केंद्रीय सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत,मतमोजणी कामी एकूण ५५० अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. ई व्हीं एम मशीन ठेवलेल्या ठिकाणी सी आय पी एफ चे जवान तैनात असून त्यानंतर राज्य राखीव दल व त्याबाहेर स्थानिक ठाणे ग्रामीण चे शेकडो पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक धोंडोपंत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचारी यांचा मोठा पोलिस फौजफाटा आज पासून या परिसरात लावण्यात आला असून मुख्य उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना वाहन तळ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तर मतमोजणी दिवशी पडघा कल्याण हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे.