ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांकडे सरकारचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:53+5:302021-07-05T04:24:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाणे जिल्ह्यात ९९ कुपोषित बालके कोरोना काळात दगावली आहे. मध्यम स्वरुपाच्या कुपोषित मुलांची एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ठाणे जिल्ह्यात ९९ कुपोषित बालके कोरोना काळात दगावली आहे. मध्यम स्वरुपाच्या कुपोषित मुलांची एकूण संख्या १ हजार ४३४ आहे. मात्र, बालके कुपोषित होणार नाहीत, त्यांचे मृत्यू होणार नाहीत. तसेच त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी सरकारी पातळीवर काहीही लक्ष दिले जात नाही. कोरोना काळात कुपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब या निमित्ताने उघड झाली आहे.
श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले की, कोरोना काळात ठाणे जिल्ह्यातील ९९ बालके कुपोषणामुळे दगावली ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रश्नावर श्रमजीवी संघटना सातत्याने काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाची १ हजार ४३४ कुपोषित बालके आहेत. पालघर जिल्ह्यात जवळपास दोन हजार कुपोषित बालके आहेत. आदिवासी भागातील माता व बालकांना सकस आहार मिळत नाही. आदिवासी भागात महिला, पुरुष हे दोन्ही शेतमजुरीचे व अन्य कष्टाची कामे करतात. लॉकडाऊनचा सगळ्य़ात जास्त फटका आदिवासी बांधवांना बसला आहे. रोजगार हमीची कामे बंद होती. आता कामे सुरू झाली आहेत. कामे सुरू असली तरी त्याचे पैसे आदिवासी बांधवांना मिळत नाही. सरकारकडून रोजगार हमीच्या बदल्यात तीन ते चार कोटी रुपये थकले आहेत. हाताला काम नसल्याने अनेकांच्या घरात खायला अन्न नाही. माता आणि बालकांना जेवायला मिळत नाही. आदिवासी भागातील माता या घरातील लाल मसाला भातात आणि भाकरीत मिसळून खातात. त्यामुळे स्तनदा मातांना दूध कमी येते. त्यामुळे मुलाला दूध मिळत नाही. कोरोना काळात खावटी कर्ज मिळालेले नव्हते. खावटी कर्जाच्या बदल्यात प्रत्येक आदिवासींना चार हजार मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी केवळ दोन हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली असली तरी सगळ्य़ा लाभार्थ्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही. त्यांच्या खात्यात रक्कमही जमा झालेली नाही.
रेशनवर आदिवासींना धान्य दिले जाते; मात्र तेल, मीठ, मिरची, कांदे, बटाटेही रेशनवर मिळावे. कारण केवळ भात कशाने खाणार असा त्यांना प्रश्न पडतो. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी जिल्हा उपरुग्णालयात मुलांकरिता कोरोना विभाग सुरु होता. कोरोनामुळेही आरोग्य सेवा बंद आहे. कोरोनाचा फटका कुपोषित बालकांच्या उपचाराला बसला आहे. शहापूर आणि भिवंडी ग्रामीण भागात जिल्हा उपरुग्णालय आहे. अन्य ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहे. त्या ठिकाणीही कोरोनामुळे लहान मुलांवरील उपचाराकरिता बाधा आली आहे. श्रमजीवीने कुपोषित बालकांसाठी जव्हार येथे छावणी तयार केली आहे. आता या छावणीत बालके नसली तरी १०० बालकांसह त्यांच्या मातांना दररोज सकस आहार दिला जात होता.
---------------------------------------------
ग्रामीण भागात जगा आणि जगवा मोहीम
ग्रामीण भागात श्रमजीवीच्यावतीने जगा आणि जगवा हे अभियान हाती घेण्यात आले आहे. मदत करणाऱ्या हाताच्या साहायाने गोरगरीब आदिवासींना अन्नधान्याचे वाटप केले जाते. तसेच कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू होतो, नपुसकत्व येते हा गैरसमज आदिवासी समाजात आहे. ते दूर करण्यासाठी श्रमजीवी काम करीत आहे. सरकारने कुपोषित बालकांच्या समस्येसह आदिवासींच्या अन्य समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी श्रमजीवीच्या माध्यमातून भोईर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.