Ambernath, Badlapur news: अंबरनाथ, बदलापूरसाठी नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्याचे शासनाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:22 PM2021-10-06T20:22:05+5:302021-10-06T20:22:46+5:30
Ambernath and Badlapur ward restructure जुने प्रभाग रचना आणि आरक्षण झाले रद्द. ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतरच स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना बदलण्याचे आणि आरक्षण बदलण्याचे स्पष्ट संकेत या आदेशात आहेत.
अंबरनाथ/बदलापूर: गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीची प्रतीक्षा करणार्या अंबरनाथ आणि बदलापूर येथील राजकीय पुढाऱ्यांना निवडणूक आयोगाने चांगलाच झटका दिला आहे. जुन्या प्रभाग रचना आणि त्यातील आरक्षण रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे 7 ऑक्टोंबर पासून नव्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
एप्रिल 2020 मध्ये अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना काळामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. पुन्हा या निवडणुका होणार या आशेवर असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर आतील राजकीय पुढाऱ्यांच्या वाट्याला आता निराशा आली आहे. शासनाने एक सदस्य पद्धत रद्द केल्याने आता भविष्यातील पालिकेचे निवडणूक पॅनल पद्धतीने होणार आहे. निवडणुका पॅनल पद्धतीने होणार असल्याने शासनाने आता अंबरनाथ आणि बदलापूरातील नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचना करत असतानाच नव्या आदेशानुसार आता जुने प्रभाग रद्द करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे अस्तित्वातील प्रभागातील आरक्षण देखील बदलण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
यासोबत ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतरच स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना बदलण्याचे आणि आरक्षण बदलण्याचे स्पष्ट संकेत या आदेशात आहेत. तसेच नवीन प्रभाग रचना करताना 2011 ची जनगणना आणि त्यात वापरण्यात येणारे ब्लॉक यांच्या नुसारच प्रभागांची रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे आता अंबरनाथ आणि बदलापूर येथील राजकारण्यांना नव्याने निवडणुकीची तयारी करावी लागणार हे निश्चित झाले आहे.