दोन कोटी झाडे लागवडीचा शासनाचा उपक्रम
By admin | Published: April 22, 2016 02:05 AM2016-04-22T02:05:16+5:302016-04-22T02:05:16+5:30
महाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ
दत्ता म्हात्रे, पेण
महाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ या सर्व मानवनिर्मित हस्तक्षेपाचा फटका, निसर्गचक्रात केलेला वारंवार बदल याची फार मोठी किंमत मानवी समाजासह जीवसृष्टीला भोगावी लागली आहे. याच संकटाचा धडा घेत राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षात सबंध राज्यभरात हिरव्या गालिच्यांचा संकल्प केला आहे. तब्बल २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ३१ मेपर्यंत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे आदेशच सामाजिक वनीकरण व वनविभागाला दिले आहेत.
पृथ्वीच्या घटकामध्ये, भूमी, जल, वायू, आकाश व प्रकाश (तेज) या नैसर्गिक संजीवक घटकांची शुध्दता व सजीव सृष्टीचे रक्षण करणे ही मानवी समाजाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या तत्वानुसारच भविष्यात मार्गक्रमणा करावी लागणार आहे. शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खासगी उद्योजक, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.
यावर्षीचा पाऊस १०६ टक्के पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन कार्यक्रम जाहीर झाला आहे. वृक्षमहोत्सव काळात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाने संकल्प केलेल्या २ कोटी वृक्षलागवडीपैकी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व वनविकास महामंडळ यांनी १ कोटी ५० लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट्य दिले आहे.