मिठाई विक्रेत्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे; गणेशोत्सवात केवळ ४० टक्केच व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:51 AM2020-08-27T00:51:46+5:302020-08-27T00:52:00+5:30
कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे.
कल्याण : कोरोनामुळे सर्वत्र उद्योग-व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात मिठाई विक्रेत्यांनाही फार मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांमध्ये केवळ ३५ ते ४० टक्के च व्यवसाय झाल्याने पुढे येणाऱ्या सणांना कसा प्रतिसाद मिळेल, याची चिंता मिठाई विक्रेत्यांना लागली आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने कल्याणमधील सुप्रसिद्ध अनंत हलवाईचे संचालक व मिठाई-फरसाण असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अनंत गवळी यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी कोरोनामुळे मिठाई विक्रेत्यांसमोर उद्भवलेली आव्हाने आणि व्यवसायात आलेली प्रतिकूलता, यावर भाष्य केले.
कोरोनामुळे चार ते पाच महिने मिठाईची दुकाने बंद होती. एकीकडे व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे मात्र भरमसाट वाढीव वीजबिले मिठाई विक्रेत्यांना आली आहेत. कोरोनाच्या काळात अन्य उद्योजकांना तसेच काही घटकांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली. परंतु, आमच्यासारख्या व्यावसायिकांकडे मात्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आम्हा मिठाई विक्रेत्यांना कोणी वाली नाही. आम्हीदेखील आजच्याघडीला कामगारांना रोजगार देतो आहोत, पण व्यवसायात नुकसान झाले असताना कोणतीही आर्थिक मदत अथवा सवलतीची कोणतीही योजना सरकारकडून जाहीर झालेली नाही, असे गवळी म्हणाले. गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण आहे. परंतु, कोरोनामुळे या सणात फार कमी व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पुढील सणांबरोबरच दिवाळीची चिंता आम्हाला लागली आहे.
कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे. तसेच पावसाचा फटकाही व्यवसायाला बसल्याचे गवळी म्हणाले. दरम्यान, अनलॉकमध्ये व्यवसाय सुरू झाले आहेत. यात पुढील काळात खाद्यप्रेमींसाठी ड्रायफ्रुट्सची फॅन्सी मिठाई आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खवय्यांसाठी ही मेजवानी असेल, असे ते म्हणाले.
‘मालमत्ताकर, वाढीव वीजबिलांमध्ये सवलत द्या’
आम्ही विक्रेते प्रामाणिकपणे कर भरतो. कोरोनामुळे व्यवसाय तोट्यात असताना मालमत्ताकर तसेच वाढीव वीजबिलांमध्ये काही प्रमाणात का होईना सवलत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा सरकारकडून असल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे.