उंबार्ली पक्षी अभयारण्याला सरकार दरबारी मान्यता मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:29+5:302021-06-17T04:27:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : डोंबिवलीचा श्वास असलेल्या उंबार्ली टेकडीला कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवलीचा श्वास असलेल्या उंबार्ली टेकडीला कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी सकाळी भेट दिली. या टेकडीवरील वन्यसृष्टी आणि पक्षी अभयारण्याला सरकार दरबारी मान्यता मिळवून देणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
शिंदे यांनी सकाळी पायथ्यापासून टेकडीची चढाई केली. यावेळी त्यांनी थंडगार हिरवाईतील मोकळ्य़ा स्वच्छ शुद्ध हवेचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम तसेच टेकडी परिसरातील धामटण, दावडी, भाल येथील नागरिकही उपस्थित होते. या टेकडीवरील वन्यसृष्टीत विविध जातींचे पक्षी विहार करताना आढळून येतात. या पक्षांची तहान भागावी, यासाठी उन्हाळ्यात खासदार शिंदे फाउंडेशनच्या वतीने पाण्याच्या दोन टाक्या टेकडी परिसरात बसविण्यात आल्या होत्या. पावसाळ्य़ात टेकडीवर पाण्याचे संवर्धन व्हावे, यासाठी बंधाऱ्याची डागडुजी करावी. तसेच तेथील वनराईचे संरक्षण व्हावे, अशा सूचनाही यावेळी शिंदे यांनी वन अधिकाऱ्यांना दिल्या. या जागेला संरक्षक भिंत बांधावी, असेही त्यांनी सूचित केले आहे. खासदारांच्या हस्ते तेथे वृक्षारोपण करण्यात आले.
----------------------