देहव्यापार करणाऱ्या महिलांसाठी शासकीय योजना राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:57+5:302021-09-18T04:42:57+5:30
भिवंडी : शहरात देहव्यापार करणाऱ्या महिलांसह त्यांच्या बालकांसाठी शासनस्तरावर विविध योजना राबविल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण ...
भिवंडी : शहरात देहव्यापार करणाऱ्या महिलांसह त्यांच्या बालकांसाठी शासनस्तरावर विविध योजना राबविल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी मंगळवारी भिवंडीत एका कार्यक्रमाप्रसंगी दिली.
श्री साईसेवा संस्थेच्या प्रमुख डॉ. स्वाती खान (सिंग) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महिलांनी स्थापन केलेल्या रामरहीम महिला मंडळाच्या माध्यमातून प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या गणेशोत्सवाच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात रेड्डी यांनी ही माहिती दिली.
देह व्यापार करणाऱ्या महिलांच्या बालकांना चांगले संस्कार, चांगले शिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहाेत. त्या माध्यमातूनच येथील पाच विद्यार्थ्यांना विविध वसतिगृहात शिक्षणासाठी दाखल केल्याची व भविष्यात येथे मुलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमातून स्वयंरोजगार मिळवून देणारे प्रशिक्षण देण्याचा मनोदयही रेड्डी यांनी यावेळी बोलून दाखविला, तर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोणाकडूनही वर्गणी न घेता प्रत्येक महिलांनी स्वयंस्फूर्तीने सजावट करीत हा उत्सव साजरा केला असल्याची माहिती डॉ. खान (सिंग) यांनी देत त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांचा जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांच्या हस्ते सन्मानित केले.