सुनील जोशी यांना गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:40 AM2019-05-30T05:40:59+5:302019-05-30T05:41:05+5:30
अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे कल्याणचे सुनील जोशी यांना पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कल्याण : आठ वर्षांपासून व्यावसायिक संगीत रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे कल्याणचे सुनील जोशी यांना पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटकातील उल्लेखनीय कामगिरीविषयी हा पुरस्कार जोशी यांना देण्यात आला आहे.
पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळ ४२ वर्षांपासून कार्यरत आहे. या मंडळाकडून हा पुरस्कार जोशी यांना दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रोख रुपये, शाल श्रीफळ आणि मानचिन्ह असे आहे. १४ जुलैला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात जोशी यांना प्रदान केला जाणार आहे.
जोशी हे कल्याणमध्ये राहतात. नाटकाची आवड त्यांना शालेय जीवनापासूनच असल्याने १९९६ पासून ते हौशी नाट्यकलाकार म्हणून नाटकात काम करत होते. २०११ सालापासून ते व्यावसायिक संगीत नाटकात काम करत आहेत.
आतापर्यंत जोशी यांनी संगीत जयजय गौरीशंकर, कान्होपात्रा, सौभद्र, संत गोराकुंभार, संन्यस्त खड्ग, देवमाणूस, कुलवधू, स्वयंवर, संत ज्ञानेश्वर या नाटकात भूमिका, निर्मिती आणि दिग्दर्शनाचे काम केले आहे.
जोशी यांना यापूर्वी स्वरबहार विश्वनाथ बागुल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा काकासाहेब खाडिलकर या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. गोविंद बल्लाळ देवल हा त्यांचा तिसरा पुरस्कार आहे. त्यांनी पुरस्कारात हॅट्ट्रिक केली आहे.
>संगीत नाट्यभूमी दुर्लक्षित झाली होती. तिच्याकडे रसिकांनी पाठ फिरवली होती. पुन्हा तिला चांगले दिवस आणून देण्यासाठी २०११ पासून ही नाटके केली. या नाटकात तरुण कलाकारांनी काम करावे, असा आग्रह धरला. संगीत नाटकातील जुन्या धक्का न पोहोचवता. तसेच तीन तासांत ही नाटके बसवली. रसिकाला कंटाळवाणे वाटणार नाही, अशी त्याची मांडणी केली. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे मी केलेल्या कामाला मिळालेली पावती आहे, असे मला वाटते. पुरस्कार मिळाल्याने मला व माझ्या टीमला खूप आनंद झाला आहे. पुरस्काराने माझ्यावरची जबाबदारीही वाढली आहे.
- सुनील जोशी