गोविंदाला मिळाले मदतीचे हात

By admin | Published: May 4, 2017 06:02 AM2017-05-04T06:02:26+5:302017-05-04T06:02:26+5:30

हलाखीच्या परिस्थितीत बारावीचे शिक्षण घेण्याची जिद्द उराशी बाळगून असलेल्या कळव्यातील गोविंदा राठोडला मदत

Govinda got help | गोविंदाला मिळाले मदतीचे हात

गोविंदाला मिळाले मदतीचे हात

Next

ठाणे : हलाखीच्या परिस्थितीत बारावीचे शिक्षण घेण्याची जिद्द उराशी बाळगून असलेल्या कळव्यातील गोविंदा राठोडला मदत करण्यासाठी शिक्षणसंस्था, शिक्षक, तरुण यांच्यासह राजकीय पक्ष पुढे सरसावले. गोविंदाच्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या पुढील शिक्षणात कशा अडचणी उभ्या राहिल्या आहेत, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी गोविंदाच्या कुटुंबाशी व ‘लोकमत’शी संपर्क साधून कुठल्याही परिस्थितीत गोविंदाचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठीमागे ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
दहावीत ८३.२० टक्के मिळवणाऱ्या गोविंदा राठोडने अकरावीमध्ये विज्ञान शाखेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याला आयएएस व्हायचे आहे. त्याच्या आईवडिलांना त्याला शिकवायची तीव्र इच्छा आहे. पण, दोघांकडे सध्या काम नाही. त्यात वडील आजारी असल्याने ते घरीच असतात. आता बारावीची फी कशी भरायची, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. त्याने बारावीचा अभ्यास सुरू केला आहे. पण, फीचे पैसे कुठून आणणार, याचे उत्तर त्याच्याकडे नाही. त्याची ही व्यथा प्रसिद्ध होताच दात्यांचे अनेक हात पुढे झाले. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी गोविंदाला बारावीची पुस्तके दिली, तर त्याच्या बारावीच्या शिक्षणासाठी अर्थसाह्य दिले जाणार असल्याचे बदलापूरचे तरुण विश्वास उद्गीरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

बिकट परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत करणे, हे मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कठीण परिस्थितीशी झगडत तो शिकतोय, याचा एक ठाणेकर म्हणून अभिमान आहे. एक चांगला अधिकारी ठाणेकर तयार करू शकले, तर ती ठाण्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल. अशा मुलांना शिकण्यासाठी हातभार लावणे, हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. तसेच, त्यांना पुढे येण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांना आज मदत करून त्यांचे भवितव्य चांगले घडवले, तर ते पुढे आणखी कोणाला मदत करतील. त्यामुळे गोविंदाला मी संपूर्ण आर्थिक मदत करणार आहे.
- निरंजन डावखरे, आमदार, कोकण पदवीधर मतदारसंघ

गोविंदाला शिक्षणाचा वार्षिक खर्च दिला जाईल आणि त्याला गरजेच्या वस्तूदेखील पुरवण्यात येतील.
- अविनाश जाधव, मिनसे, ठाणे शहराध्यक्ष

आनंद विश्व गुरुकुल गोविंदाला शिक्षणासाठी दत्तक घेणार आहे. त्याला ग्रंथालयापासून सर्व सोयीसुविधा मोफत दिल्या जातील. आयएएस होण्यासाठी लागणारी सर्व तयारी या महाविद्यालयातून आम्ही करून घेऊ.
- प्रा. प्रदीप ढवळ, सचिव,
आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय

लोकमतमध्ये माझा माजी विद्यार्थी गोविंदा याच्या पुढील शिक्षणासाठी मदतीच्या आवाहनाची बातमी वाचली. मी सुद्धा विविध दानशूर व्यक्तींकडे त्याच्यासाठी मदत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मी व माझ्या शाळेतील सर्व शिक्षक मिळून पाच हजार रुपयांची मदत म्हणून देत आहोत.
- आनंदा सूर्यवंशी,
मुख्याध्यापक, शारदा विद्यामंदिर

गोविंदाला पुढील शिक्षणासाठी जीजी पुस्तके आवश्यक आहेत, तीती पुरवण्यात येतील तसेच इतर शैक्षणिक मदतही करण्याची इच्छा आहे.
- राजेंद्र राजपूत, प्राचार्य, मो.ह. विद्यालय

तळागाळातील मुलांना प्रशासनात येण्याची संधी मिळावी, हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. त्यांना या संधीपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे काम आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत प्रथम यावा, अशी आमची तीव्र इच्छा आहे. गोविंदाला स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल. तो आयएएस होईपर्यंत जेजे प्रशिक्षण द्यावे लागेल, तेते त्याला आम्ही मोफत देऊ.
- वैशाली पाटील, संस्थापिका, स्टडी सर्कल

Web Title: Govinda got help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.