गोविंदाला हवा एकवार मदतीचा हात
By admin | Published: May 3, 2017 05:44 AM2017-05-03T05:44:34+5:302017-05-03T05:44:34+5:30
घरी अठराविश्वे द्रारिद्र्य असताना इयत्ता दहावीत ८३.२० टक्के गुण मिळवणाऱ्या गोविंदा राठोडने इयत्ता अकरावीमध्ये आपली यशाची
प्रज्ञा म्हात्रे / ठाणे
घरी अठराविश्वे द्रारिद्र्य असताना इयत्ता दहावीत ८३.२० टक्के गुण मिळवणाऱ्या गोविंदा राठोडने इयत्ता अकरावीमध्ये आपली यशाची भरारी कायम ठेवत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. विज्ञान शाखेत शिकत असलेल्या गोविंदाला आयएएस होण्याची तीव्र इच्छा असली तरी बारावीचाच शैक्षणिक खर्च कसा करायचा हा यक्षप्रश्न राठोड कुटुंबासमोर आहे. बिगारी काम करणाऱ्याच्या मुलाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न कसे साकार होणार, अशी गोविंदाच्या वडिलांना चिंता लागली आहे.
कळव्यातील जयभीम नगर येथील छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या गोविंदाने दहावीच्या परीक्षेत ८३.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर गाठले. दहावीनंतर हे यश टिकवून ठेवणे त्याच्यासाठी आव्हान होते. दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणारी अनेक मुले ही भाषेच्या अडचणीमुळे अकरावीत गंटागळ््या खातात हे आपण पाहिले आहे. मात्र एकीकडे घरची गरिबी आणि दुसरीकडे शिक्षणासाठी सुरु असलेली धडपड अशी तारेवरील कसरत करीत त्याने इयत्ता अकरावीमध्येही यश कायम राखले. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय आणि केळकर महाविद्यालयात त्याने प्रवेश अर्ज भरला होता. परंतु काही आवश्यक कागदपत्रांअभावी या ठिकाणी त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर त्याला न्यू कळवा महाविद्यालयात विज्ञान शाखेतून शिकण्याकरिता त्याला प्रवेश मिळाला. प्रवेशासाठी लागणारी ८३०० रुपये फी कशी भरायची हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर होता. फी कमी करण्यासाठी त्याच्या कुटुंबाने महाविद्यालयाला विनंती केली. परंतु ती मान्य झाली नाही. गोविंदाला अकरावी प्रवेशाकरिता शाळेतील शिक्षक, काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदत मिळाली. अगोदर पाच हजार रुपये आणि दोन महिन्यांनी उर्वरित पैसे भरून त्याने प्रवेश घेतला होता. घरची गरिबी आणि आपण चांगले शिकून आई-वडिलांना या परिस्थितीतून बाहेर काढण्याची जिद्द यामुळे गोविंदा दिवस रात्र अभ्यास करीत होता. घरची जबाबदारी सांभाळत त्याने अकरावीच्या परीक्षेकरिता घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. त्याने ७९.८४ टक्के मिळवून विज्ञान शाखेतून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. प्रथम आल्याबद्दल त्याच्याकडे सर्वजण पेढे मागू लागले पण त्यावेळी त्याच्या खिशात फक्त २० रुपये होते. मात्र त्याने हसतमुखाने आपल्या मित्रमंडळींच्या हातावर पेढे ठेवले.
आई-वडील बेरोजगार
गोविंदाला आयएएस व्हायचे आहे. त्याच्या आई वडिलांना त्याला शिकवायची तीव्र इच्छा आहे. पण दोघांनाही सध्या काम नाही. त्यात वडील आजारी असल्याने ते घरी असतात. त्यामुळे आता इयत्ता बारावीची फी कशी भरायची असा प्रश्न गोविंदासमोर आहे.