गोविंदांना सुरक्षेचा दोरखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:14 AM2017-08-16T02:14:17+5:302017-08-16T02:14:20+5:30

मोठ्या रकमेची बक्षिसे लावणाºया बड्या दहीहंडी मंडळांनी यंदा गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या दिशेने पाऊल टाकून स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले

Govind's security cord | गोविंदांना सुरक्षेचा दोरखंड

गोविंदांना सुरक्षेचा दोरखंड

googlenewsNext

ठाणे : ठाणे, डोंबिवली व कल्याण येथील मोठ्या रकमेची बक्षिसे लावणाºया बड्या दहीहंडी मंडळांनी यंदा गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या दिशेने पाऊल टाकून स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले. मात्र पाच किंवा सहा थर लावणाºया छोट्या दहीहंडीच्या आयोजकांनी अद्याप सुरक्षेच्या उपाययोजनांचे फारसे मनावर घेतलेले नाही.
जिल्ह्यातील मोठ्या दहीहंडी आयोजकांनी सुरक्षेचे उपाय योजूनही ११ गोविंदा जखमी असून त्यामध्ये रितेश कनोजिया (११) व सिद्धेश म्हसवले (१२) या दोन बाल गोविंदांचा समावेश आहे.
सर्वात वरच्या थरावरील गोविंदाला खेळात सहभागी करून घेण्यापूर्वी त्याचे आधारकार्ड तपासून तो १४ वर्षे वयापेक्षा कमी तर नाही ना, याची खातरजमा अनेक मोठ्या मंडळांनी करून घेतली. काही मोठ्या मंडळांनी तर १४ वर्षाखालील गोविंदा पथकातील मुलांना दहीहंडीच्या ठिकाणी प्रवेशही नाकारला. वरच्या थरावरील गोविंदांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याचे बहुतांश ठिकाणी दिसले. त्याचबरोबर सर्वात वरच्या थरावरील गोविंदा खाली पडून मृत अथवा जखमी होऊ नये याकरिता त्याच्या कंबरेला हार्नेस बांधले होते. त्यामुळे गोविंदा खाली न कोसळता हवेत लटकत राहत होता व थोड्या वेळाने त्याला खाली उतरवणे शक्य होत होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांतील उंच थरांच्या दहीहंड्यांपाशी पोलीस व्हीडिओ शुटींग करीत होते. सर्वात वरच्या थरावर चढणारा मुलगा कोण होता, याची नोंद ठेवण्याकरिता शुटींग केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सेफ्टी नेट किंवा खाली गाद्या पसरून गोविंदांना अधिक सुरक्षित करण्याचे उपाय योजल्याचे कुठेच दिसले नाही.
गेल्या काही वर्षांत सुरक्षेचे उपाय नसल्याने अनेक गोविंदांचे मृत्यू झाले किंवा ते जायबंदी झाले. त्यामुळे न्यायालयाने गोविंदांच्या वयावर व दहीहंडीच्या उंचीवर निर्बंध आणले. साहजिकच यामुळे गोविंदा व दहीहंडी मंडळांच्या उत्साहावर विरजण पडले. अलीकडेच उच्च न्यायालयाने राज्य सरकार, दहीहंडी आयोजक व गोविंदा पथक यांच्यावर सुरक्षेची खबरदारी घेण्याची जबाबदारी सोपवली होती. पुन्हा न्यायालयाचा दट्ट्या बसू नये या भीतीने असेल किंवा उशिरा शहाणपण सुचल्याने असेल यंदा सुरक्षेचा दोरखंड पाहायला मिळाला.
>गुन्हे दाखल करणार : ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी यंत्र घेऊन पोलीस चौकाचौकत उभे होते. ज्या चौकात वाहनांच्या आवाजाच्या प्रदूषणापेक्षा दहीहंडी आयोजकांच्या ध्वनीक्षेपकांचा आवाज मोठा असेल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Govind's security cord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.