शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 30, 2023 10:36 PM2023-09-30T22:36:58+5:302023-09-30T22:37:10+5:30

मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने येथील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Govt committed to development of Marathwada - Chief Minister Eknath Shinde | शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :- हे शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे. "मराठवाडा मुक्ती संग्राम" हे इतिहासातील न विसरता येणारे पर्व आहे. या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना शतशः नमन करतो आणि हे शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देतो,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने येथील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर, कृषी मंत्रीधनंजय मुंडे, आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे, अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन कदम, डॉ. दिलीप सपाटे, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ.अविनाश भागवत, डॉ.राजेश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मराठवाड्यातील स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्तीसाठी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. हे शासन मराठवाडा विकासासाठी कटिबद्ध आहे. यासाठीच मराठवाड्यातील विविध प्रकल्पांसाठी 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीस मंजूरी देण्यात आली आहे. मराठवाडा विकासित होणारच. मराठवाडा समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचबरोबर नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गासही मराठवाडा जोडला जाणार आहे.

आयोजकांनी "मराठवाडा भवन" साठी शासनास प्रस्ताव सादर करावा. याविषयी निश्चित सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे जाहीर करून जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी मोहीम लवकरच सुरू करण्यात येत असून त्यास.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री यांनी शेवटी केली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्राम कधीही विसरू नका. आपल्या कार्यातून हा इतिहास टिकवून ठेवायला हवा. सबंध महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याचाही विकास नक्कीच होणार. त्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार मनापासून कष्ट घेत आहेत. मुख्यमंत्री हे फक्त काम करणारेच मुख्यमंत्री असून त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उत्तम साथ मिळत आहे. शिंदे हे सर्वसामान्यांसाठी झटून काम करणारे मुख्यमंत्री असल्याने ही अपेक्षा निश्चित पूर्ण होणार, हा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या हस्ते पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना "मराठवाडा भूषण" पुरस्काराने गौरविण्यात आले तर कैलास जाधव (प्रशासकीय क्षेत्र), सोमनाथ वाळके (शैक्षणिक क्षेत्र), कर्ण एकनाथ तांबे (सामाजिक क्षेत्र), मिलिंद शिंदे (कला क्षेत्र), सोनाली मात्रे (प्रशासकीय क्षेत्र), आत्माराम सोनवणे (सामाजिक क्षेत्र) यांना "मराठवाडा रत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Govt committed to development of Marathwada - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.