वाड्यातील भातखरेदी केंद्रांना लागली शासकीय ‘उदासीनतेची घूस’
By admin | Published: February 1, 2016 01:10 AM2016-02-01T01:10:15+5:302016-02-01T01:10:15+5:30
तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला
वसंत भोईर, वाडा
तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला असून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्राच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यामार्फत भातखरेदी केंद्र वाडा तालुक्यात खानिवली, गोऱ्हे, परळी, पोशेरी, तिळगाव, खैरे-आंबिवली या ठिकाणी सुरू करण्यात आली. परंतु या केंद्रावर भात भरण्यासाठी लागणारे पोतीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारूनही भातविक्री करता येत नाही. त्याच प्रमाणे या केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अपमानित करत असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भाताची प्रतवारी ठरवितांना नुकसान सोसावे लागत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाडा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भात पिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने शेतकऱ्यांची गर्दी या केंद्रावर वाढली आहे. त्यामुळे या केंद्राच्या भात साठवणुकीच्या गोडवूनची क्षमता मर्यादित असल्याने अनेक शेतकरी भातविक्री पासून वंचित रहात आहेत.
तालुक्यातील महसूली गावांची संख्या १५० हून अधिक असताना केवळ सात भातखरेदी केंद्र सुरू केल्याने या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागत असल्याने शिवाय अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने आधीच न परवडणाऱ्या शेतीत बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती शेतकऱ्याची आहे. अशा या उदासिन धोरणामुळे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना हमी भावापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील देवघर येथील प्रगतीशिल शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यातील भातखरेदी केंद्रांची संख्या कमी असून भातखरेदी करण्याचे प्रमाण अल्प आहे. शिवाय शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारूनही पोती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. तर खानिवली भातखरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधला असताना ७०० क्विटंल भातखरेदी केल्याचे सांगून अधिकाधिक भाताची खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.