जि.प. लिपिक काळ्या फिती लावून काम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:34 AM2019-09-02T00:34:51+5:302019-09-02T00:34:59+5:30
लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना या लिपिकवर्गाच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेत आहे.
ठाणे : महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची भेट घेऊन ५ सप्टेंबर रोजी सर्व लिपिक काळ्या फिती लावून काम करण्याचा आणि ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.
लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना या लिपिकवर्गाच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेत आहे. यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याच्या पवित्र्यासह सनदशीर मार्गाने एकदिवसीय संप पुकारणार असल्याचे त्यांनी शनिवारी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. यानंतरही शासनाने दुर्लक्ष केले तर, ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे. या आंदोलनांमुळे जिल्हा परिषदेचे कामकाज रखडण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना म्हणून शासनाने प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
लिपिकवर्गाच्या या आंदोलनात सर्व शासकीय, निमशासकीय, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, परिचर, विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनाद्वारे कर्मचाºयांकडून जुनी पेन्शन योजना लागू करणे, वेतनत्रुटी सुधारणा, समान काम - समान वेतन, केंद्र शासनाप्रमाणे प्रसूती रजा, लिपिकवर्गीय ग्रेड पे सुधारणा आदींसह अन्य इतर मागण्या या कर्मचाºयांकडून आंदोलनाद्वारे केल्या जात आहेत.