धान्य बँकेचे जाळे आता महाराष्ट्रभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:49 PM2019-12-31T22:49:09+5:302019-12-31T22:49:25+5:30
पन्नास हजार किलो धान्य देण्याची क्षमता; एक गाव, एक धान्य बँक, दोन संस्था
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : भुकेलेल्यांच्या पोटाला अन्न पुरवण्याचा संकल्प केलेल्या उज्ज्वला बागवाडे यांच्या ‘धान्य बँक’ या अभिनव उपक्रमाचे जाळे आता महाराष्ट्रभर पसरणार आहे. गरजू सामाजिक संस्थांना अन्नधान्य पुरविण्याचा संकल्प त्यांनी नव्या वर्षांत केला आहे. या गरजू संस्था असणाऱ्या गावांत त्या धान्यबँकेचे केंद्र सुरू करणार आहेत. ‘एक गाव, एक धान्य बँक, दोन संस्था... एक सुरूवात’ अशी संकल्पना वुई टुगेदर संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
आतापर्यंत या संस्थेने आपल्या धान्यपेढीतून हजारो किलो धान्य पुरवले आहे. गोरगरिबांच्या अन्नदात्री ठरलेल्या बागवाडे यांनी सुरूवातीला बीड जिल्ह्यातील सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्था दत्तक घेतल्या. सध्या १९ संस्थांना वुई टुगेदरच्या माध्यमातून धान्य पुरविले जात आहे. त्यापैकी नऊ संस्थांना एक महिनाआड असे वर्षातले सहा महिने धान्य दिले जाते तर १० स्थानिक पातळीवरच्या संस्थांचे पालकत्व या संस्थेने घेतले आहे. नऊ संस्थांमध्ये सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्थांसह माऊली मोखाडा, माऊली सिंधुदुर्ग, नगर येथील संकल्प संस्था आणि स्नेहप्रेम, पुणे येथील आजवळ, अमरावती येथील प्रश्नचिन्ह तर दहा संस्थांमध्ये समतोल, शबरी, सुहीत, घरकुल यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. १२ मैत्रिणींपासून सुरू केलेल्या या उपक्रमाशी आता १४३ गृहिणी जोडल्या गेल्या आहेत. ५० हजार किलो धान्य देण्याची ताकद आता या संस्थेची असल्याचे बागवाडे यांनी सांगितले. दर महिन्याला दाते मंडळी या संस्थेच्या ग्रीन बँकमध्ये आपले पैसे जमा करतात आणि संस्थांना ही मदत धान्यस्वरुपात केली जाते. दर वर्षाला १०० रुपये महिना प्रमाणे प्रत्येकी १२०० रुपये किंवा त्याहून अधिकही रुपये प्रत्येक कमवता हात आपली मदत देत असतात. आता हे कार्य इतर गावांतही पोहोचविण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
धान्यबँकेशी प्रत्येक गाव जोडले जाणार
या उपक्रमात प्रत्येक गावातील गरजू संस्था निवडल्या जाणार आहेत. अन्नदानाची इच्छा असणाºया व्यक्ती या मोहिमेशी जोडल्या जातील आणि स्वत:बरोबर त्यांच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी जोडल्या जातील. परिणामी एका विचाराची सर्व मंडळी एकत्र येऊन प्रामाणिक काम करणाºया संस्थाच्या मागे शिधेच्या रुपाने उभ्या राहतील अशा प्रकारची ही संकल्पना आहे. यामुळे धान्यबँकेशी प्रत्येक गाव जोडण्यात येणार असल्याचा मानस बागवाडे यांनी व्यक्त केला आहे. अन्नदानाची इच्छा असणाºया व्यक्तींनी bagupb@gmail.com यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्या माध्यमातून संस्थांना मदत केली जाणार आहे. यामुळे संस्था जबाबदार होतील, स्थानिक दानशूरांना मी माझ्या गावातील संस्थेला मदत केल्याचे समाधान मिळेल आणि त्यांना मदत करण्यासाठी हुरूप येईल.