ग्रा.पं.कडे अग्निशमन यंत्रणाच नाही
By admin | Published: May 7, 2015 12:10 AM2015-05-07T00:10:31+5:302015-05-07T00:10:31+5:30
औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.
रोहिदास पाटील, अनगाव
औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील लोकसंख्या आणि आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.
तालुक्यात ११८ ग्रामपंचायती, २३९ महसूली गावे व १०० पाडे व आदिवासी वाड्या आहेत. त्यापैकी पूर्णा कोपर-कशेळी, काल्हेर मानकोळी, दापोडे, सोनाळे, अंजूर-दिवे, पिंपळास आदी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. परिसरात ज्वलनशील रासायनिक कंपन्या असल्यामुळे आग लागण्याचे प्रमाणही जास्त आहे. या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकांच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घ्यावी लागते. मदतीसाठी येणारे हे अग्निशमन बंब वाहतूककोंडीत अडकल्यास त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होतो. तेव्हा मोठी जीवित व वित्तहानी होते.
तालुक्यातील कुठल्याच ग्रामपंचायतीकडे अग्निशमन बंब नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ज्या पंचायतीच्या कार्यक्षेत्रात गोदामे व कंपन्या आहेत, त्या पंचायतीला याविषयी माहिती देऊन यासंबंधी ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न कडून याबाबत शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येईल.
- डॉ. करुणा जुईकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भिवंडी
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर कारखाने, गोदामे येथे अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने काढले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. ती होण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेण्यात येईल.’’
- प्रकाश पाटील, गटनेते जि.प. ठाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण