Gram Panchayat Election Result: ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा
By अनिकेत घमंडी | Published: December 20, 2022 05:37 PM2022-12-20T17:37:58+5:302022-12-20T17:38:42+5:30
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद ...
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद जिंकले आहे. मुरबाडमध्ये १४ पैकी ८, कल्याणमधील ९ पैकी ५ ग्रामपंचायतीतही भाजपाने यश संपादन केले. तर भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठीत कोनगाव व कारिवली ग्रामपंचायतीतही भाजपचा झेंडा फडकला आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व कायम राहिल्याचा दावा मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.
जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज सकाळी नऊपासून सुरू झाली. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून भाजपाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. भिवंडी तालुक्यातील १३ पैकी १० ठिकाणी भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. तर दोन ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना, तर एका ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजय मिळाला. शहापूरमध्ये पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत भाजपाने एकहाती वर्चस्व मिळविले. तर मुरबाडमधील १४ पैकी ८ व कल्याणमधील ९ पैकी पाच ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठीत व श्रीमंत कोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या रेखा सदाशिव पाटील, कारिवलीत संजय परशुराम नाईक, आमणे येथे विश्वपाल रामदास केणे, सापे येथे भाजपाचे गोरखनाथ बारकू सुतार, कोपरमध्ये हेमंत घरत, आवळे विश्वगड येथे प्रिती पवन देसले, खालिंग बु. येथे राजाराम पाटील, दुगाडमध्ये प्रेमा प्रकाश मुकणे, कांबे येथे आरती विजय जाधव, अकलोली येथे संचिता म्हसकर यांनी भाजपाचा झेंडा फडकविला.
भाजपाच्या उमेदवारांनी दणदणीत यश मिळविल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांनी निवडणुकीची रणनीती आखल्याचे ते म्हणाले.
शहापूरातही दोन ग्रामपंचायती -
शहापूर तालुक्यात झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर भाजपाने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुकाध्यक्ष भास्कर जाधव व सुभाष हरड यांच्या प्रयत्नाने चिखलगाव व बाभळे येथे भाजपला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मुरबाड, कल्याणमध्ये आघाडी
मुरबाडमधील १४ पैकी ८ ग्रामपंचायतीत भाजपाला यश मिळाले. तळेगाव, साकुर्ली, डोंगरन्हावे, मोहघर, कान्होळ, तोंडली, वैशाखरे, मोहघर येथे भाजपाचा झेंडा फडकला. तर कल्याणमधील ९ पैकी पाच ठिकाणी भाजपाने सरपंचपद जिंकल्याचे ते म्हणाले.
तीन महिन्यांपूर्वीही भिवंडीत भाजपाच अव्वल
सुमारे तीन महिन्यांपूर्वी भिवंडी तालुक्यात झालेल्या निवडणुकीतही ३१ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सर्वाधिक १२ ग्रामपंचायती जिंकल्या होत्या. तर उद्धव ठाकरे गटाला ८, बाळासाहेबांची शिवसेना, श्रमजीवी आणि मनसेला प्रत्येकी एक, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट व अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर यश मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.