ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत महाआघाडीचे ‘तीन तिघाडे...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:56 AM2021-01-12T00:56:23+5:302021-01-12T00:56:41+5:30

प्रचारात रंगत : काही ठिकाणी मात्र एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत

In the Gram Panchayat elections in Thane district, the grand alliance's 'three three ...' | ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत महाआघाडीचे ‘तीन तिघाडे...’

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत महाआघाडीचे ‘तीन तिघाडे...’

googlenewsNext

सुरेश लोखंडे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार जोरात रंगला आहे. आठ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. मात्र, जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचारात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पुरस्कृत उमेदवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. या तिन्ही पक्षांचे  विधानसभेत जमले.  मात्र, त्या राजकीय डावपेचांना न जुमानता स्थानिकांकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुका आपल्याच मर्जीने लढविल्या जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५८ च्या निवडणुका होत आहेत. एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींपैकी आठ बिनविरोध ठरल्या. तर उर्वरित १४३ च्या निवडणुकांसाठी दोन हजार २३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील बहुतांश उमेदवार राजकीय पक्षांचे पुरस्कृत आहेत, पण राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या पुरस्कृत उमेदवारांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधाऱ्यांनी सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे राज्य व जिल्हा पातळीच्या राजकारणास विचारात न घेता आपल्या गावातील एकमताचा आदर व त्यातील एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेऊन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लोकशाही मार्गाने लढण्यास गावकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.  

 निकालानंतर बदलू शकते चित्र
n ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीकडे राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत आक्रमकतेकडे 'वेट अँन्ड वॉच, ॲफ्टर कॅच ! चे सूत्र महाविकास आघाडीने अवलंबले आहे. 
n जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे प्राबल्य अधिक आहे. भिवंडीला भाजप, शहापूर, मुरबाडला शिवसेना आणि कमी अधिक प्रमाणात कल्याण अंबरनाथलाही 
कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नाते, संबंधावर उमेदवार दिला जातो. जिल्ह्यात काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत आहेत. वरप गावची ग्रामपंचायत राष्ट्रवादीने बिनविरोध जिंकली आहे, पण काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार प्रतिस्पर्धीही आहेत.
  - दशरथ तिवरे, 
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ग्रामपंचायती निवडणुकीत एकाच घरातील व्यक्ती एकमेकांविरोधात लढतात. तेव्हा पक्ष म्हणून आपण त्यांच्यात भांडण लावणे योग्य नाही.  त्यांच्यात फूट पाडून या निवडणुका लढल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही या निवडणुकांत रस घेतलेला नाही. मी खासदार हाेतो तेंव्हाही या निवडणुकांमध्ये सहभागी झालेलो नाही. या निवडणुका बिनविरोधच झाल्या पाहिजेत.  
- सुरेश टावरे, 
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

नातेसंबंधांना महत्त्व
स्वपक्षाचे उमेदवार स्थानिक नातेसंबंध, पाठबळ विचारात घेऊन या निवडणुकांमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी झालेले आहेत. त्यांचा प्रचारही गावांत शिगेला पोहोचला आहे. एक हजार ४७२ सदस्यांसाठी होत असलेल्या या निवडणुकांमध्ये ४१८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार उत्तम आहे. गावपाड्यांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या निवडणुकीतही शिवसेनेसह आघाडीचे पुरस्कृत मोठ्या प्रमाणात विजयी होतील. त्यासाठी जिल्ह्याचा एक आढावा घेण्यात येत आहे.
  -प्रकाश पाटील, 
जिल्हाप्रमुख, शिवसेना

 

Web Title: In the Gram Panchayat elections in Thane district, the grand alliance's 'three three ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.