कामाच्या बिलाच्या मंजूरीसाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच घेतान ग्रामसेवकाला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: June 12, 2024 05:17 PM2024-06-12T17:17:04+5:302024-06-12T17:17:33+5:30
ठाणे एसीबीची कारवाई: मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे: इमारत बांधकामाच्या २० लाखांच्या कामाचे टेंडर मंजूरीनंतर दहा लाख रुपये संबंधित ठेकेदाराला मंजूर झाले. परंतू, उर्वरित दहा लाखांच्या बिलाच्या मंजूरीसाठी दोन टक्क्यांप्रमाणे २० हजारांची मागणी करुन १७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना यासीन शेख (५२, नांदगाव, पंचायत समिती, मुरबाड) या ग्रामसेवकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
यातील संबंधित तक्रारकर्ते ठेकेदाराला नवीन इमारत बांधकामाचे टेंडर मंजूर झालेले आहे. त्या कामाचे सुमारे २० लाख रुपये बिल मंजूर केले होते. त्यातील अर्ध्या बांधकामाची दहा लाखांची रक्कम यापूर्वी त्यांना देण्यात आली होती. उर्वरीत नऊ लाख २४ हजार ५९५ इतक्या रक्कमेचे बिल मंजूरीसाठी शेख यांनी त्यांच्याकडे दोन टक्के प्रमाणे २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १७ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले होते. याच दरम्यान या ठेकेदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ११ जून २०२४ रोजी ठाणे एसीबी पथकाने पडताळणी केली. यामध्ये शेख यांनी लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे उघड झाले. त्यानंतर एसीबीच्या ठाणे युनिटने सापळा लावून १७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारतांना शेख यांना मंगळवारी दुपारी ३.२० वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले, अशी माहिती ठाणे एसीबीने दिली. मुरबाड पोलिस ठाण्यात याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.