पुरस्कार मिळणार नसल्यामुळे ग्रामसेवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:17 AM2018-11-03T04:17:57+5:302018-11-03T07:09:34+5:30
सर्व निकष पूर्ण करूनही पुरस्कारासाठी निवड झाली नसल्याचे कळताच कल्याण पंचायत समितीच्या नियंत्रणातील वाकळण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रघुनाथ हरड यांनी संतापात विषप्राशन करून आत्महत्या केली.
ठाणे : निलंबित झालेल्या, पात्र नसलेल्या ग्रामसेवकाची उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाली. पण, सर्व निकष पूर्ण करूनही पुरस्कारासाठी निवड झाली नसल्याचे कळताच कल्याण पंचायत समितीच्या नियंत्रणातील वाकळण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रघुनाथ हरड यांनी संतापात विषप्राशन करून आत्महत्या केली.
या घटनेमुळे ३ नोव्हेंबर रोजी होणारा हा पुरस्कार वितरण समारंभ रद्द केल्याच्या वृत्तास ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.वाय. जाधव यांनी दुजोरा दिला. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामसेवकांना येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाद्वारे उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सर्व निकष पूर्ण करत असतानाही हरड यांची निवड झाली नाही. यासाठी त्यांनी कार्यालयात वादही घातला होता. या मनस्तापातून त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा हरड यांच्या गावासह जिल्ह्यातील ग्रामसेवकांमध्ये ऐकायला मिळत आहे.
यासंदर्भात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय शेळके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीदेखील या वृत्तास दुजोरा दिला. या आत्महत्येमागे त्यांच्या परिवारातील वादही कारणीभूत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ऐन दिवाळीत अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषदेने पुरस्कार सोहळा रद्द केला असून अन्य योजनेच्या आढाव्यासह मार्गदर्शनासाठी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील ग्रामसेवकांची बैठक घेतली जाणार आहे. या आत्महत्येविषयीचे मूळ कारण जिल्हा परिषद प्रशासनाने शोधून दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
आजचा पुरस्कार सोहळा रद्द
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामसेवकांना येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाद्वारे उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यासाठी सर्व निकष पूर्ण करत असतानाही हरड यांची निवड झाली नाही. त्यामुळे त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. मुरबाड तालुक्यातील सरळगावजवळील डांगुर्ले येथील हरड मूळचे रहिवासी आहेत. हरड यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला पुरस्कार वितरण समारंभही जिल्हा परिषदेने रद्द केला आहे.